राष्ट्रीय स्वंयम् संघाच्या (RSS) सेवकांचा आदर्श; मोसंबी विकून जमवले पैसे अन गरजूंना केली मदत!

जालना / प्रतिनिधी
     जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील राष्टीय स्वयं सेवकांनी मोसंबीची विक्री करून आर्थिक स्त्रोत उभा केला व त्यातून आलेल्या नफ्यामधून गरजूंना किराणा सामान कीट वितरीत केला. दुर्बल घटकातील १३१ कुंटुबांना यामुळे मोठी मदत झाली.

    जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी निस्वार्थ सेवा कार्य करत एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. लॉकडाऊन काळात सर्वत्र समस्या निर्माण झालेल्या असताना अंध, अपंग, आर्थिक दुर्बल, वंचित, दिव्यांग, भूमिहीन, वयस्क, विधवा अश्या सर्व गरजूंना किराणा सामान कीट देऊन मदत केली. विशेष म्हणजे यासाठी पैसा उभा करण्यसाठी स्वयंसेवकांनी स्वतः मोसंबीची विक्री केली . व आलेल्या नफ्यातून किराणा सामान कीट तयार केला. गाव परिसरातील तब्बल १३१ कुटुंबांना यातून मदत करण्यात आली. जनकल्याण समिती व साप्ताहिक मिलनातील स्वयंसेवकांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
     लॉकडाऊन काळात अनेक दुर्बल, वंचित घटकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेकांना खाण्यासाठी अन्न सुद्धा उपलब्ध नव्हते. यात दिव्यांग व्यक्ती, विधवा, वयस्क व आर्थिक दुर्बल घटकांवर तर मोठे संकट कोसळले होते. अश्यावेळी गरजूंना मदत करायची म्हणजे आर्थिक मदत हवी. परंतु, अश्या परिस्थितीत प्रत्येकजण काटकसर करत होता. अनेक ठिकाणी सज्जन शक्ती मदतीसाठी तयार होती, परंतु केवळ त्यावर भागणार नव्हते. म्हणून वालसावंगी येथील स्वयंसेवकांनी एक योजना आखली.

    मार्च-एप्रिल महिना म्हणजे मोसंबी काढणीचा काळ. बाजारात मोसंबी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली होती. स्वयंसेवकांनी हीच संकटातील संधी शोधली. मोसंबी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी चांगले फळ. त्यामुळे आजूबाजूच्या गावात मोसंबी विकायची, ज्यामुळे नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मोसंबीच्या माध्यमातून सहकार्य होईल आणि त्यामधून जो नफा येईल, तो सर्व सेवाकार्यासाठी वापरायचा असे ठरविण्यात आले.
     या योजनेनुसार एकूण १५ ते २० स्वयंसेवक युद्ध पातळीवर कामाला लागले. मोसंबी थेट शेतकऱ्यांकडून विकत घेण्यात आली. या काळात ४० ते ५० रुपये किलोने विक्रेत्यांकडून मोसंबीची विक्री होत होती. परंतु या स्वयंसेवकांनी केवळ २५ रुपये किलो या दराने मोसंबी विकली. जेणेकरून अधिकाधिक लोक मोसंबी घेतील जी त्यांच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. त्यामुळे काही स्वयंसेवकांनी स्वतः फळविक्री करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी विक्री करतानाच आपल्या मोसंबी विक्रीमागचा उद्देश लोकांना सांगायला सुरुवात केली. मोसंबी विक्री करणाऱ्या लोटगाडीवर तश्या मजकुराचे फलक लावण्यात आले. आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्ती वाढीसाठी विटामिन-सी चा मोठा स्त्रोत म्हणून मोसंबी असून आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अशी माहितीही सोशल मिडिया द्वारे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचविण्यात आली. त्यामुळे मोठ्या संख्खेने मोसंबी विक्री होऊ लागली. धावडा, वाढोगा, विझोरा, जाळीचा देव, कोलवाडी, पदमावली, पारध या गावापर्यंत जाऊन स्वयंसेवकांनी मोसंबीची विक्री केली.
      गावातील नागरिकांना याची माहिती होताच त्यांनी मोठ्या प्रमाणात धान्य व वस्तूच्या तसेच पैश्याच्या स्वरुपात शक्य तितकी मदत करण्यास सुरु केली. त्यामुळे किराणा सामान कीट अधिक संख्येने तयार होऊ लागली. अश्या प्रकारे महिनाभरात एकूण ४० क्विंटल मोसंबीची विक्री करण्यात आली. ३० क्विंटल मोसंबी वालसावंगी येथे तर १० क्विंटल मोसंबी अन्य गावी विकण्यात आली. या मधून २५ हजार इतका निव्वळ नफा मिळाला. शिवाय नागरिकांनी अन्न धान्य आणून दिले होतेच. काही ग्रामस्थांनी पैश्याच्या स्वरूपातही मदत केली. त्यामुळे एकूण १३१ गरजू कुटुंबांना किराणा सामान कीट वितरीत करण्यात आला. यामध्ये गहू, तांदूळ, हरभरा डाळ, खाद्य तेल, साबण, मसाले, व मीठ आदी वस्तूंचा समावेश होता.
     वालसावंगी येथील या सेवाकार्याचे प्रकल्प प्रमुख असलेल्या राजू जानकीराम कोथलकर यांनी देवगिरी विश्व संवाद केंद्राने संवाद साधला असता ही माहिती दिली. “कोरोनाचे अचानक आलेल्या संकटात समाजातील दुर्बल घटकाची अवस्था पहाण्यासारखी नव्हती, परंतु अश्या सगळ्यांना सहज मदत करता येईल . अशी कोणाची परिस्थितीही नव्हती. परंतु तरीही यातून मार्ग काढत ‘देश हमे देता है सबकुछ, हम भी तो कुछ देना सीखें’ या शाखेत म्हंटल्या जाणाऱ्या गीताप्रमाणे गावातील सर्व समाज, जनकल्याण समिती व साप्ताहिक मिलनातील स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन हे सेवाकार्य यशस्वी केले. आम्ही स्वयंसेवकांनी याची सुरुवात केली होती, परंतु समाजाच्या सहभागामुळे अधिक मदत करता आली असे त्यांनी सांगितले.
    सेवाकार्यात वालसावंगी येथील राजू कोथालकर यांच्या समवेत मनीष पुंडलिक बोडखे, प्रकाश राघो पवार, गणेश छगनराव पायघन, किशोरकुमार श्रुराम फुसे, हिरालाल दगडूशेठ कोथालकर, संजय कचरूशेठ कोथालकर, गजानन बाबुराव आखाडे, गणेश शाळीग्राम फुसे, दिनेश रमेश फुसे, दिनेश शंकर कोथालकर, सुभाष दगडूबा फुसे, राजू आगे, कृष्णा मन्साराम गारोडी आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!