पेठ वडगाव /ता.२०-प्रतिनिधी
ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने गावागावात भीतीचे वातावरण आहे.पण हा आजार एक सामान्य आहे . त्याच्याशी घरातूनच मुकाबला करून त्यास परतवून लावता येते . हे कृतीतून सिद्ध केलंय किणी ( ता.हातकणंगले ) येथील एका कुटुंबाने. विशेष म्हणजे सामाजिक जाणीव ठेवून ग्रामस्थांनी त्यांना दिलेली साथ उभारी देणारी ठरली. सासू व दोन सुनांनी घरातच उपचार घेत कोविडपासून अवघ्या दहा दिवसांत मुक्ती मिळविली.घरात राहून सुद्धा आरोग्य नियमांचे पालन करून बरे होता येते. घाबरू नका जिद्दीने, संयमाने कोरोनावर मात करता येते असा संदेश त्यांनी दिला आहे.
दोन आठवड्यापूर्वी या कुटूंबातील एका युवकास कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्याची आई, पत्नी व भावजय यांनाही कोरोना झाला.कुटुंबातील सात पैकी चौघे बाधित झाले.त्यातील युवकावर अतिग्रे येथे उपचार सुरू झाले.तर वृद्ध सासू व दोन सुनां यांनी मात्र घरीच राहून उपचार घेण्याचा निर्णय घेतला.त्यास मोठा मुलगा यांनी पाठबळ दिले.
भादोले आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक सचिन मोरे,आशा स्वयंसेविका निलोफर शेख यांनी उपचार सुरू केले.दिवसातून तीन वेळा तपासणी करून औषधे देण्यात आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका यांनी सातत्य ठेवले. तर गावातील डॉ मिलींद कुंभार. डॉ. नितीन माळी यांचे मार्गदर्शन मिळाले .
विशेष म्हणजे त्यांना शेजारी पाजारी, मित्र मंडळी यांच्या घरातून जेवण मिळू लागले.दावणीच्या चार दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचीही व्यवस्था उस्फूर्तपणे त्यांनी केली. येथे मैत्री आणि माणुसकीचा धर्म पाळला. संकटात सहकार्याचे मदतीसाठी हात सरसावले. त्यामुळे मोठा हातभार लागला. जेवणाचा त्रास दुसऱ्यांना द्यायचा नाही . ही भूमिका घेत काही दिवसांनी कोरोनाग्रस्त महिलांनी सर्व ती दक्षता घेत स्वयंपाक घरी बनवण्यास सुरवात केली.कोरोना नसलेल्या कुटूंबातील अन्य व्यक्तीही त्याचा आस्वाद घेऊ लागली. सॊशल डिस्टन्सिंग चे नियम पाळून नित्यक्रम चालू राहिला.स्वतंत्र खोलीत राहून सुद्धा कुटुंब समाधानात आनंदात रमले. लक्षणे कमी झाली. प्रकृती उत्तम होत चालली. विशेष म्हणजे सासूला मधुमेह, हृदयाचा त्रास आहे. पण ही कुटुंबप्रमुख माता खंबीर राहिली . तिने धीटपणा सोडला नाही.सुनांना सोबत घेत कोरोना आजारा सोबत लढली. दहा दिवसानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. कुटुंब यशस्वी झाले. त्यांच्या आजाराविरोधातील या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होवु लागले.
त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी कोरोनाला घाबरू नये . त्याच्यावर धाडसाने मात करता येते . असा आदर्श संदेश त्यांनी दिला आहे. शासनाच्या आरोग्य खात्याच्या सहकार्यातून घरीच अलगीकरणातून उपचार करून कोविड रुग्ण बरे करण्याचा धाडसी उपक्रम किणी येथे यशस्वी झाला. किणी येथील पत्रकार शांतिकुमार पाटील यांनी आपल्याच घरी सकारात्मकातून राबविलेल्या या उपक्रमाला त्याच्या कुटुंबियानीही चांगले सहकार्य केले, त्यातून त्यांची आई , पत्नी आणि भावजय यानी कोरोनावर मात केली . आणि ठणठणीत बरे झालेल्या या तिघांचे रिपोर्टही अधिकृतरित्या निगेटिव्ह आले आहेत. आणि हा उपक्रम एक मार्गदर्शकही ठरु शकतो ,अशी प्रतिक्रिया आता गावातून व्यक्त होत आहे.
