गारगोटी ता.३१ (प्रतिनिधी)
जखीनपेठ (ता . भुदरगड जि. कोल्हापुर ) येथील पवनचक्की कापून साहित्य लंपास करणारी टोळी भुदरगड पोलीसानी गजाआड केली असुन मुख्य सुत्रधारासह सात जणांना अटक केली आहे. तर दोघे जण फरारी झाले आहेत. पोलीसांनी चोरट्याकडून ट्रक, मोटरसायकल, गॅस सिलेंडर, कटर व पवनचक्कीचे साहित्य असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

जखीनपेठ येथील पठारावर मारूती विंड कंपनीने पवनचक्की बसविली आहे. सद्या येथील पवनचक्की बंद अवस्थेत आहेत. या ठिकाणचे साहित्य चोरीस जात असल्याची चर्चा होती. त्यामुळे पोलीसांची बारीक नजर ठेवली होती. पोलीस निरीक्षक संजय पतंगे व त्यांच्या पथकाने गुरूवारी रात्रभर पाळत ठेवली असता पहाटेच्या सुमारास जखीनपेठ-राणेवाडी दरम्यान ट्रक धावतांना आढळून आला. पोलीसानी अधिक तपास केला असता ट्रकमध्ये पवनचक्कीचे साहित्य, सहा मोठी व दोन लहान गॅस सिलेंडर, गॅस कटर आढळून आले. पोलीसानी ट्रक, एक मोटरसायकल, गॅस सिलेंडर, गॅस कटर असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी प्रकाश कळमकर (वय-५२ ), रमेश हरी खोत (वय-५३ रा. दोघे रा. हणबरवाडी), बापू नामदेव गोंधळी (वय-३५), शिवाजी मारूती भोसले, महेश मुरलीधर कलकुटकी (सर्व रा. गारगोटी), अनिल आनंदा सुतार (वय-३० रा. पडखंबे), चंद्रकांत नामदेव पाटील (वय-२९ रा. मोेरेवाडी) यांना अटक झाली असुन दिपक सखाराम माने (रा. गारगोटी), अशोक गणपती बावकर (रा. जखीनपेठ) हे दोघे फरारी आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे करीत आहेत.