हुपरी /प्रतिनिधी
वृद्ध रुग्ण महिलेच्या बँकेच्या खात्यातून तब्बल दोन लाख रुपये रक्कम परस्पर ऑनलाईन पद्धतीने एका डॉक्टरने काढून घेतली . फसवणूक झाल्याचे वृद्ध रुग्ण महिलेच्या व तिच्या नातेवाईकांना समजल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली . त्यानंतर फसवणूक केलेल्या डॉक्टरने गुन्हा दाखल होणार या भीतीने लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने काही रक्कम परत करुन प्रकरणावर पडदा टाकून विषय गोल केला. ही धक्कादायक घटना चांदीनगरी हुपरी (ता. हातकणंगले ) येथे घडली असून रुग्णांची अशी फसवणूक करुन लुटणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील एका डॉक्टरने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोवीड उपचार केंद्र सुरू केले. पण रुग्णांची संख्या कमी झाल्याने त्यांनी त्याच सेंटरमध्ये कोरोना वगळता अन्य उपचार सुरू केले . कर्नाटक राज्यातील एक वृद्ध महिला हुपरी येथील नातेवाईकांच्याकडे आली होती . आजारी पडल्याने व त्रास होत असल्याने तिला या डॉक्टरांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला उपचारासाठी ॲडव्हान्स रक्कम म्हणून तीस हजार रुपये भरून घेण्यात आले .
काही दिवस उपचार केल्यानंतर वाढीव बिलासाठी डॉक्टरांनी व हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडून वसुलीसाठी पिच्छा सुरू केला . त्यानंतर डॉक्टरांनी कर्नाटकातील मांजरी येथील बँकेतील अधिकाऱ्याची संपर्क साधून त्या महिलेच्या खात्यातून तब्बल दोन लाख रुपये टप्प्याटप्प्याने काढून घेतले . हा सर्व लुटीचा प्रकार वृद्ध रुग्ण महिलेच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना सांगितला . पो. नि. मस्के यांनी फसवणूक केलेल्या डॉक्टरला बोलवुन घेवुन चांगला दम देऊन परिणाम सुनावले. यानंतर डॉक्टरांच्या बाजूने काही लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करून काही रक्कम परत करून प्रकरण गोल केले. या घटनेने हुपरी शहरातील डॉक्टरच्या धक्कादायक प्रकाराने संताप व्यक्त केला जात असून अशा लुटारू डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.