रुईत गणरायाचे साधेपणाने पण उत्साहात स्वागत

रुई ता. २२ – प्रतिनिधी

    रुई (ता.हातकणंगले ) येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील गणरायाचे आगमन अगदी भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात झाले. सकाळपासूनच गणपती बाप्पा मोरया च्या गजरात गावातील चावडी, ग्रामपंचायत चौक,तसेच इतरत्र असणाऱ्या गणपती स्टॉलवरून गावातील सर्वच गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाण्याची लगबग चालु होती .यामध्ये बालचमूंपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वांचाच सहभाग अगदी उत्साहात दिसत होता. अनेक बालमंडळी फटाके फोडत लाडक्या गणरायाला आपल्या घरी घेऊन जात होती. 

  अनेक गणेशभक्तांनी चालत तर काहींनी मोटारसायकलवरून गणपतीला घेऊन जाण्याची व्यवस्था केली होती. तर गावातील काही भागात अगदी वाजत गाजत गणरायाचे आगमन झाले.  महिला मंडळींनी औक्षण करून गणरायाचे घरांमध्ये स्वागत केले. कोरोनाचा पार्श्वभूमीवर गावात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तरुणाई मात्र घरातील गणेश उत्सवातच मग्न दिसत होती. गणरायाचे आगमन झाल्यामुळे सर्वत्र भक्तीपूर्ण वातावरण बनले आहे.

             रुई येथे कोरोनाची सावधगिरी घेत गणरायाचे स्वागत करताना गणेशभक्त

error: Content is protected !!