भावड्या, दिसमान काय खरं रायलं न्हाई. पोटात काय कोळसं घालायचं काय ?

दाजीबा !

    दोस्ता कसा हाईस गड्या? उगाचंच तुझी काळजी वाटली म्हणून पतार लिवलं. येळवरं खाईत जा, भावडय़ा. दिसमान काय खरं रायलं न्हाई. कोरूनानं सगळीकडं नुसता धुडगूसच घातलाय. शेरातलं लोन आता गावातबी यीवून धडकलय बाबा! आपापल्या घरात लोकांनी लय दिस गुमान बसून बघीतलं तरीबी कोरोना काय हाटायचं नाव घेईना. बरं ही पाॅट बी लई खुळ्या बोडयाचं हाय न्हवं! त्ये काय घरात बसून देतंय व्हय? घरात बसून पोटात काय कोळसं घालायचं काय? कितीक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ह्यो कोरूना आल्यापसनं माणूस माणसापसनं लईच लांब गेला गड्या! गावात काय घेऊन बसलाईस मर्दा गल्लीतलं माणूसबी पाच मिंट थांबून सवनं मन पाक करून बोलंनासं झालंय. एकमेकांला भेटायला…एकमेकांसंग बोलायला.. माणूस दचकायला लागलंय. 

  रात दिस तोंडाला फडकी बांधून चोरावानी हिंडायची पाळी आली गड्या. दुध घालाय डेरीत गेलं तर तिथं गोल..बॅंकेत गोल..सोसायटीत गोल..बाजारात गोल..जिकडं बघंल तिकडं गोलच गोल..दोस्ता दाजीबा!माणसाचं समदं आयुष्यचं ह्या आजारानं पार गोल करूनशान टाकलं बघ. लई लई वरसामागं एकदा अशीच पटकीची साथ आलती तवाबी आत्तावाणी माणसं पटापटा मेली हुती. दवाखान्यात माणसं मायना झालती. तशीच आत्ताबी ह्या आजारानं दवाखान्यात माणसं टापरून भरल्याती. थांबायचं नावच घेईना ह्यो कोरूना. रोज हितं एक घावला..तर तिथं चार घावली…ह्यो पाझिटीव तर त्यो निगीटीव …ऐकून ऐकून डोसक्याचं पार बेंपाळ झालंय मर्दा! एखादा कुप्रसिद्ध गुंड घावल्यावानी लोकं कोरूना पेशंटकडं बघाय लागल्याती. ह्ये काय आपल्याला रूचलं न्हाय गड्या. 

    माणसानं माणसाशी माणसावानी वागाय पायजे. कितीबी संकट आलं तरीबी व्यवहार आणि माणुसकी सोडता कामा नये. माणूसकी ह्योच जगातला सगळ्यात मोठा धर्म हाय. त्यो जीवंत ठेवाय पाहिजे समदयांनी. काय म्हणणं हाय तुझं दाजीबा? आसूदे तुम्हीबी सांभाळून रावा.उगंच विनाकारनाचं हिकंडं तिकडं हिंडू नगा.दिसंल त्याला रामराम ठोका .आन् येवढं साल जरा जीवाला जपा.जगू वाचू तर गावभर नाचू. खडखडीत हून पुना भेटू. रामराम दोस्ता दाजीबा!

तुझाच जीवाभावाचा मैतर सखोबा !

लेखन-
दिनकर खाडे.
7066838288
7020911230
dinkarkhade5913@gmail.com

 

 

error: Content is protected !!