आपणच विजयी होऊया

       परवा मला माझ्या एका प्रशिक्षणार्थीचा फोन आला. कामाच्या संबंधी चार गोष्टी बोलून झाल्यावर चर्चा सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीकडे सरकली. बोलता बोलता त्या प्रशिक्षणार्थीने मला थेट विनंती केली –
“सर, या कोरोनापेक्षा मरणाची मनात खुप भीती बसली आहे. त्याबाबत मला काहीतरी मार्गदर्शन कराल तर खूप बरं होईल.”

      तिच्या मनातली मरणाची भीती दूर करण्यासाठी तिच्याशी मी सविस्तर बोललो. तिचं समाधान झालं असावं कारण शेवटी फोन बंद करताना ती मला खूष वाटली. त्यानंतर काही वेळ मी याच गोष्टीचा विचार करीत राहीलो. मला लक्षात आले की त्या एका प्रशिक्षणार्थीच्या मनात असलेली मरणाची भीती आपण दूर केली; पण जगात आपल्या अवतीभवती असे अनेक लोक असतील त्यांच्या मनात अशीच मरणाची भीती दबा धरुन बसलेली असेल. त्यातल्या अनेकांना हा प्रश्न कुणाला विचारायचा हेही कळले नसेल. अशा सर्वासाठी मी हा आजचा लेख लिहायला घेतला आहे.
आपल्या मनातील या मरणाच्या भीतीचं नेमकं काय करायचं? कारण कोरोनाच काय आणखी कोणत्याही व्हायरस पासून स्वतःला वाचवणं कदाचित अधिक सोपं आहे . परंतू जगातल्या अनेक लोकांच्या डोक्यात बसलेल्या या मरणाच्या भीतीपासून स्वतःला वाचवणं हे खूप कठीण काम आहे. कदाचित व्हायरसची बाधा झाल्यामुळे कमी लोकं मरतील, परंतू या मरणाच्या भीतीनं मात्र अधिक लोकांचा मृत्यू होवू शकतो. भीती हा या संपूर्ण विश्वामधला सर्वात धोकादायक असा व्हायरस आहे. म्हणून सर्वप्रथम आपण या भीतीच्या व्हायरसचा बंदोबस्त्त योग्य रीतीने करायला हवा अन्यथा आपल्यापैकी अनेकांना जीवंतपणीच मृत्यूचा अनुभव घ्यावा लागेल.
     आपल्या सभोवती निर्माण झालेल्या या भीतीदायक वातावरणाचा व्हायरसशी तितकासा संबंध नाही. लोकांचं हे घाबरुन जाणं, त्यामूळं प्रशासनानं, पोलीस खात्यानं दिलेल्या सूचनांचं पालन न करता केवळ आडमुठेपणाचं वर्तन करीत राहाणं हा खरंतर निव्वळ वेडेपणा आहे. विशेष म्हणजे हा वेडेपणा सार्वत्रिक किंवा सामायिक स्वरुपाचा वेडेपणा आहे. कधी हा वेडेपणा व्यक्तिगत स्वरुपाचा असतो.  कधी कधी जात, धर्म, प्रदेश किंवा राष्ट्राच्या पातळीवर सुद्धा हा सार्वत्रिक वेडेपणा दिसून येतो. अशा सार्वत्रिक वेडेपणामुळे अनेक लोकांच्या वागण्यात एक प्रकारचं वैचित्र्य किंवा विक्षिप्तपणा निर्माण होतो आणि अनेक लोकांचा यात मृत्यू देखील होतो. समाजात अशा घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत आणि यापुढेही अधूनमधून घडतच राहाणार आहेत. कोरोना सारखी आणखी संकटं यापुढेही येतच राहणार आहेत.
मला असं वाटतं की, ज्यांना प्रत्येकवेळी येणाऱ्या संकटाची फक्त भीतीच वाटते असे लोक केवळ मूर्ख असतात. शहाणे लोक अशा संकटातही चांगल्या संधीचा शोध घेत असतात.
कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. माणसं एकमेकांच्या संपर्कात आली की हा आजार मोठ्या प्रमाणात पसरणार आहे. त्यामूळे आपल्या देशाबरोबरच जगभरातील आरोग्य आणि आर्थिक पातळीवरील परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाईल. अशा वेळी आजाराची भीती, आजारामूळे येवू शकणाऱ्या मरणाची भीती बाळगण्यापेक्षा आपण स्वतःच्या घरातच राहाणं सर्वांच्या हिताचं आहे.
     आजाराचा खूप जास्त विचार करणं टाळायला हवं. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ‘भीती वाटून घाबरणं’ हे साधारण माणसाला नेहमीच आवडत असतं. आपण त्यासाठी भूतांच्या कथा ऐकतो, वाचतो, पाहातो. हॉरर सिनेमा बघायलाही बहूतेक सर्वांना आवडत असतो. म्हणजे घाबरण्यातही एक प्रकारची गंमत असते ! परंतू सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी भीती वाटणं गंमतीचं असणार नाही, हे आपण गांभीर्यानं लक्षात घ्यायला हवं. समाज माध्यमे आणि प्रसारमाध्यमांमधून हा सार्वत्रिक वेडेपणा सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामागे प्रत्येकाचं स्वतःच्या फायद्याचं, स्वार्थाचं आणि सामान्य लोकांना न समजणारं असं अनाकलनीय गणित असतं. तुम्ही गर्दीचा भाग बनून त्यांचं गिऱ्हाईक बनावं इतकंच या माध्यमांचं धोरण असतं. पुन्हा पुन्हा त्याच त्या बातम्या रंगवून सांगितल्या की आपल्या मनात भीती निर्माण होते.
जगातल्या अनेक जाणत्या, शहाण्या आणि विद्वान माणसांच्या मते, आपल्याला भीती वाटतेय अशा बातम्या बघणे आणि वाचणे 

  आपण प्रयत्नपूर्वक टाळले पाहिजे. फेसबुक, व्हॉटसॅपमध्येही आपण स्वतःला इतके गुंतवून घेतो आणि शेवटी बाजारव्यवस्थेचे बळी ठरतो. वास्तविक आपल्या मनात भीती निर्माण होईल, आपल्याला मरणाचे भय वाटेल असा कोणताही व्हिडीओ, चित्र, बातमी आपण मूळीच पाहू नये. अशी भीती हे सुध्दा एक प्रकारचे संमोहन आहे. एकाच प्रकारचे भीतीदायक विचार सतत मनात यायला लागले की त्याचे दुष्परिणाम शरिरावर, मनावर आणि मेंदूवर होवू लागतात. आपल्या शरिरात वेगवेगळ्या रासायनिक क्रिया घडत असतात. आपल्याला वाटणाऱ्या सततच्या भीतीचा अत्यंत प्रतिकूल परिणाम या सर्व रासायनिक क्रियांवर होवू शकतो . आणि याचा परिणाम म्हणून आपला मृत्यू होवू शकतो. 

          कोरोनाशिवाय या जगात आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. आपण त्यांचाही विचार करायला हवा. सध्या सर्वत्र नकारात्मक विचार मोठ्या प्रमाणात पसरले असून त्यातूनच सर्वांच्या मनात काळजी व भीती निर्माण झाली आहे. यापासून बचाव करायचा असेल तर आपण सकारात्मक उर्जा निर्माण करायला हवी. त्यासाठी घरबसल्या सत्संग, साधना याबरोबरच योग्य आहार, स्वच्छता इ. गोष्टी लक्षपूर्वक अंमलात आणल्या पाहिजेत.
      थोडक्यात सांगायचं तर थोडं धीरानं घ्या. लवकरच ही सारी परिस्थिती निवळेल. परिस्थितीत बदल होईल.  सर्वात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत मृत्यू आपल्याजवळ येत नाही. तोपर्यंत त्याला भिण्याचं, घाबरण्याचं काहीच कारण नाही. आणि मृत्यू सर्वांसाठीच अटळ असताना त्याला घाबरण्यात काय अर्थ आहे? हा भीतीचा व्हायरस आपल्याला बाधित करणार नाही . याची सगळे जण मिळून काळजी घेवूया. आलेल्या संकटाला धीराने सामोरे जाऊया. आपणच विजयी होवूया.

श्री अनिल उदावंत
    ज्येष्ठ प्रशिक्षक व
समुपदेशक    
    सावेडी, अहमदनगर    
   संपर्क : 97666 68295

pune
error: Content is protected !!