वारणेच्या आरोग्य विभागाचे मार्गदर्शक डॉ.सुधाकरराव कोरे यांचे निधन

नवे पारगाव/ता.२३- प्रतिनिधी

   वारणानगर येथील वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचे सुपुत्र,नवे पारगांव येथील महात्मा गांधी  चँरिटेबल मेडिकल ट्रस्टचे उपाध्यक्ष, तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ.सुधाकरराव कोरे (वय.८८) यांचे आज सायंकाळी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले.
    पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार डॉ. विनय कोरे,वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांचे ते चुलते होत.त्यांच्या मागे पत्नी डॉ.शरदिनी कोरे,मुलगा वारणा आरोग्य समूहाचे प्रमुख डॉ.शैलेश कोरे,मुलगी डॉ.शिल्पा कोठावळे, जावई डॉ.नितीन कोठावळे,नातू डॉ.कौशल कोठावळे, सून,नातवंडे असा परीवार आहे.


   गेल्या चार दिवसापुर्वी डॉ.सुधाकरराव कोरे यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल केले होते.उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. डॉ. सुधाकरराव कोरे यांनी परदेशात अस्थिरोग तज्ञ म्हणून नावलौकीक प्राप्त केला.त्यानंतर त्यांचे मिरज येथे “कोरे हाँस्पिटल” होते. दरम्यान सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांनी डॉ.कोरे यांच्यावर नवे पारगांव (ता.हातकणंगले) येथील महात्मा गांधी रुग्णालयाची जबाबदारी सोपविली आणि त्यांनी जबाबदारी समर्थपणे स्विकारली.डॉ.कोरे यांनी महात्मा गांधी मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय व संशोधन केंद्र, तात्यासाहेब कोरे नर्सिग महाविद्यालय,डॉ.सुधाकरराव कोरे महात्मा गांधी हाँस्पिटल कामगारांची पतसंस्था स्थापन करून अतिशय उत्तम रित्या चालविल्या.डॉ.कोरेनी सर्व सामान्य कुटुंबातील शेकडो युवकांना रोजगार दिला.डॉ.कोरे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात घराघरांत पोहचले होते. रविवारी सायंकाळी त्यांची कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली. तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
        यावेळी डॉ. आम. विनय कोरे यांच्यासह कोरे कुटुंबिय,वारणा समूहातील पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आदरांजली वाहण्यात आली.रक्षाविसर्जन मंगळवार (दि.२५) रोजी सकाळी आठ वाजता नवे पारगांव येथे आहे.

error: Content is protected !!