मागे वळुन पाहताना मला पडलेले प्रश्न : श्री अनिल उदावंत

सप्रेम नमस्कार,
   तब्बल सहा महिन्यांपासून कोरोनानं आपलं दैनंदिन जगणं बाधित केलं असून हा करोनाकाळ पुढे आणखी किती लांबणार आहे याचं भाकीत अद्याप कुणालाच करता आलेलं नाही. असं असुनही, का कुणास ठाऊक; पण मला या सहा महिन्यांकडे परत वळून पहावेसे वाटले आणि मी तसा प्रयत्न केला आहे.

  सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे मार्च आणि एप्रिलच्या मध्यापर्यंत आपणास कोरोनाची खरीखुरी माहिती मिळालेलीच नव्हती. अर्थात आपल्याला हे कळण्यास मे महिना उजाडला. तोपर्यंत ‘कोरोना आपल्या देशातल्या हवामानापुढे तग धरु शकणार नाही!’ आणि ‘आम्हा भारतीयांची प्रतिकारक्षमता जगातील इतर देशांमधल्या लोकांपेक्षा अधिक आहे!’ अशा भ्रमात राहून टाळया किंवा थाळया वाजवणं, दिवे लावणं, ‘गो कोरोना गो’ च्या तालावर ठेका धरणं अशाच गोष्टींमध्ये आपण रमलो होतो.

   मे महिन्याच्या १२ तारखेला माझ्या मुलाचा विवाह करण्याचं आम्ही योजिलं होतं परंतु सरकारने घोषीत केलेला लॉक डाऊन आणि त्यासाठीच्या नियमांमुळे हा विवाह स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेतला. एव्हाना कोरोना आणि लॉक डाऊनचा तडाखा बसून बेरोजगार झालेल्या मोठया शहरांतील कामगारांची आपल्या मायभूमीच्या दिशेने पायपीट सुरु झाली होती. ‘शेकडो, हजारोच्या संख्येने रोज होणाऱ्या या स्थलांतराने कोरोनाची ताकद आणखी वाढेल!’ ही भीती जूनमध्ये खरी ठरु लागली. ग्रामीण भारताच्या खेडोपाडयात कोरोना वेगाने जाऊन पोहोचला. तपासण्या करायच्या की नाही? कुणाच्या तपासण्या करायच्या? त्या कुणी आणि कशा करायच्या? याबाबतचं धोरण ठरवणं हेच सरकारचे प्रधान कर्तव्य बनलं. ही परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते याचा अंदाज माझ्या काही ज्येष्ठ मित्रांना आल्याने त्यांनी माझ्या मुलाचं लग्न आम्ही जूनमध्येच करुन घ्यावं असा आग्रह धरला. प्राप्त परिस्थितीला शरण जात आम्हीही १२ जून रोजी सरकारी नियमांचे पालन करीत केवळ पन्नास व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह पार पाडला. हव्याहव्याशा असलेल्या पाहुणे व मित्रमंडळीची उपस्थिती याप्रसंगी मिळवता आली नाही. ही एक गोष्ट सोडल्यास सारं काही सुरळीत पार पडलं. आमच्या कुंटूबात नवं माणूस आल्यानं वातावरण आनंदी झालेलं होतं. मात्र नव्या नवरीला हळद फेडण्यासाठी माहेरी जाता येणार नव्हतं, म्हणून अहमदनगरमध्येच एका पाहुण्यांकडे तिला पाठवून हळद फेडण्यासाठी माहेरी जाण्याच्या प्रथेची आणि परंपरेची बुज आम्ही राखली. तोपर्यंत कोरोनाने अहमदनगर शहरात आपले चांगलंच मोठं बस्तान मांडलं होतं.

     संपूर्ण देश लॉक डाऊन झाल्यामुळं माणसं आपापल्या घरात एका अर्थानं लॉकअपमध्ये होती. अजुनही बहुतांश लोकांचा रोजगार बंद आहे. त्यामुळे प्रश्नांची संख्यात्मक वाढ होताना त्यासोबतच प्रश्नांची तीव्रताही वाढत आहे. मात्र सध्याच्या आभासी माध्यम दुनियेत माझं कसं छान चाललंय हे दाखवण्याची जणू स्पर्धा सुरु आहे.

     लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यात मनोरंजन म्हणून काही गंमतकोडी, प्रश्नमंजूषा, वेगवेगळ्या पोझमधले फोटो, घरी निगुतींन बनविलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज हे सगळं आपणास मोठ्या प्रमाणात दिसलं. जसजसा लॉक डाऊनचा काळ वाढू लागला तसतसं लोकांच्या मनाला वेगळंच कोडं पडू लागलं आणि आधीचं सगळं अनाठायी, खर्चिक आणि न परवडणारं आहे याची जाणीव झाली. आता काय करायचं? म्हणून लोकं टीव्हीकडं वळाली. पण तिथंही पुन्हा पुन्हा त्याच त्या कोरोनाच्या भीतीदायक बातम्या पहायला मिळत होत्या. नवीन शुटींग बंद असल्यानं बाकीचे कार्यक्रम रिपीट पहावे लागत होते. त्यामूळं टीव्हीचा पर्यायही बाद झाला होता.

      कोरोना संसर्गाची भीती, त्यासाठी पाळावयाचे सामाजिक अंतर, सुरक्षितता म्हणून वापरायचे मास्क, सततचे हात धुणे, जागोजागी सॅनिटायझरचा वापर, गरम पाणी पिणे, वेगवेगळे आयुर्वेदिक / वनौषधी काढे करुन पिणे या स्वतःहून करावयाच्या उपाययोजना अवलंबताना माणसं आतून तुटत गेली. त्यांच्यातील नात्यांची वीण सुटत गेली. माध्यमांवर अफवांचा पूर आला आणि कधी काळी पाहिलेल्या, आजवर जपलेल्या सगळ्याच स्वप्नांचा चक्काचूर झाला! एकमेकांशी बोलणेच खुंटले! आणि कुणी बोलू लागलेच तर फक्त गावा-गावातील, शहरा-शहरांतील कोरोनाची आकडेवारी तोलू लागले! भीतीनं मनाचा संपूर्ण ताबा घेतल्यानं जीवनातल्या निखळ आनंदाचा गाभा गायब झाला!

      मी मात्र माझ्यापुरता मार्ग शोधला होता! संपूर्ण लॉक डाऊनच्या काळात मी विपुल लेखन केलं. प्रतिदिन मी किमान एक कविता लिहीली. समुपदेशनाच्या अंगाने जाणाऱ्या माझ्या कविता प्रामुख्याने आपली प्रचलीत समाजव्यवस्था, मानवी संबंध, प्रथा -परंपरा, विविध समाजघटकांचे त्यांच्या जगण्याशी निगडीत असलेले विविध प्रश्न आणि मानवी मनाच्या विविध अवस्था या विषयी भाष्य करतात. याच काळात अधुन-मधून मी विविध विषयांवरचे वीस -पंचवीस लेख लिहीले. हे सर्व लिखाण WhatsApp, Facebook, Bookstruck इ. च्या माध्यमातून प्रसिद्ध करुन हजारो वाचक आणि स्नेह्यांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. दै. प्रभात (अहमदनगर), दै. गावकरी (नाशिक) ही वर्तमानपत्रे व मुंबई येथील साप्ताहिक राजगड सत्ता, आणि कोल्हापूर येथील MSK Digital News यांनी माझे काही लेख प्रसिद्ध केले. या लॉक डाऊनने मला खऱ्या अर्थाने ‘लेखक’ आणि ‘कवी’ अशी ओळख महाराष्ट्रभरात मिळवून दिली.

     मला अतिशय आनंदाने आणि अभिमानाने सांगता येईल की ‘तुम्हालाही डिप्रेशन आलंय का?’ हा माझा डिप्रेशनवरचा एक लेख वाचायला मिळाल्यामुळे “आम्ही आमचं जीवन संपवण्याचा अर्थात आत्महत्या करण्याचा निर्णय रद्द केला असून नव्या उमेदीने पुढील आयुष्य जगायचं ठरवलं आहे” असं सांगणारे चार फोन महाराष्ट्राच्या चार वेगळ्या शहरांमधून आले. माझा लेख वाचून हे चार प्राण वाचले, त्यांची कुटूंब उध्वस्त होण्यापासून वाचली. ही मला फार मोठं समाधान मिळवून देणारी गोष्ट या लॉक डाऊनच्या काळातच घडली. माझा लेख या चौघांपर्यंत पोहोचवणाऱ्या सर्व ज्ञात व अज्ञात स्त्रोतांचा मी शतशः ऋणी राहील.

     माझ्या कवितां गावून, त्यांचे व्हिडीओ चित्रीत करुन कु. प्रांजल (माझी मुलगी ) आणि सौ. पूजा ( माझी स्नुषा ) यांनी माझा उत्साह वाढविला. माझ्या अनेक लेख व कवितांना वाचकांनीही भरभरुन दाद दिली आणि म्हणूनच मी लिहीता राहीलो. मी घरातच असूनही या लिखाणाच्या निमित्ताने माझा मित्रपरिवार, व्यावसायीक सहकारी, समव्यावसायिक, माझे विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी या सर्वांशी माझा नियमित संपर्क राहिला. राज्यभरातल्या अनेक नव्या लोकांशीही मी जोडला गेलो. झारखंड ला देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानाने खास फोन करुन माझ्या कवितांचे कौतूक केले. ही या काळातील आणखी एक मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.

     कोरोनाकाळात हातात उत्पन्नाचं कोणतंही शाश्वत साधन राहीलेलं नसताना, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत अगदी न चुकता रोज एक कविता लिहीण्याचं व्रत अर्थातच माझी सहचारिणी सौ. अनिता, मुलगा विवेक, मुलगी प्रांजल आणि सूनबाई सौ. पूजा या सर्वांच्या पाठींब्यामुळेच मी तडीस नेवू शकलो.

   एकीकडे हे सगळं सुरु असताना माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले जसे की-
१) ज्या लोकांचा इतरांशी सध्या कोणताच संवाद होत नसेल अशी माणसं हा दीर्घकाळ चाललेला लॉक डाऊन संपल्यावर कुणा-कुणाला आणि कशी- कशी भेटतील?
२) त्यांच्यातील नात्यांमध्ये पूर्वीइतकाच विश्वास टिकून राहीलेला दिसेल का?
३) कोरोना सोबतचं या माणसांचं जगणं नक्की कसं होतं याची फक्त चर्चा करतील की या अनुभवानं माणसं काही नवा मार्ग चोखाळतील?
४) लॉक डाऊन संपल्यावर या माणसांना सर्वात आधी कुणाला भेटावंसं वाटेल?
या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मी करतोच आहे, त्याबद्दल मी सवडीने सविस्तर लिहीनच, परंतु आपल्याला या प्रश्नांची उत्तर ठाऊक असतील तर आपण कृपया ती शेअर करावीत. कारण मला पडलेले हे प्रश्न इतरही अनेक जणांना पडले असतील. त्यांना या आपल्याकडून मिळणाऱ्या उत्तरांचा निश्चित उपयोग होईल.

श्री अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५
error: Content is protected !!