शिरोली / प्रतिनिधी
मोदी सरकारने संसदेत मंजुर केलेले शेतकरी कृषी विधेयके मागे घ्यावे. या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने मोदी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेवून सरकार विरोधात घोषणाबाजी केली.व तावडे हाॅटेल येथे पंचगंगा नदी जवळ पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको , चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते व पोलिस यांच्यात झटापट झाली. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून सोडले . तर २६ नोव्हेंबरला भारत बंदची हाक ही देण्यात आली .

रास्ता रोको करताना आंदोलनाचे संघटक भाकप जिल्हा सहसेक्रेटरी गिरीश फोंडे म्हणाले, संसदेत पास केलेली कृषी विधेयके ही शेतकरीविरोधी व जनता विरोधी आहेत. बाजार समित्या बरखास्त करुन अदानी ,अंबानी यांनी कमी किंमतीत शेतीमाल ताब्यात घ्यायचा असा कायदा केला आहे. त्यामुळे शेतीचं कार्पोरेटीकरण व कंत्राटीकरण शेतीच्या माध्यमातून होणार आहे. शेतीमाल हमीभावाचा कायदा करणे गरजेचे असताना सरकारने या कृषी विधेयकातील पावले शेतकरी विरोधी टाकली आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते वैभव कांबळे म्हणाले , मोदी सरकार केवळ भांडवलदारांचे हस्तक आहेत. नव्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजून वाढतील. स्वामीनाथन आयोगाचे अंमलबजावणी करण्याचे भाजपने जाहीरनाम्यात मान्य केले होते . पण सत्तेवर आल्यावर शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शे.का.प.चे प्राचार्य टी. एस. पाटील म्हणाले, भाजप सरकार म्हणजे शेटजी भटजीचे सरकार आहे. या देशातल्या शेतकरी बळीराजाचे शोषण हा तत्वज्ञानाचा भाग आहे.
यावेळी जनता दलाचे नेते रवी जाधव, भाकपचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे, समाजवादी पार्टीचे हसन देसाई, राष्ट्रवादी पक्षाचे व्यंकाप्पा भोसले आम आदमी पार्टीचे संदीप देसाई यांची भाषणे झाली.
शिरोली एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले व गांधीनगर पोलीस निरीक्षक भांदवलकर, तसेच सुशांत चव्हाण यांच्या निगराणीखाली सकाळपासूनच प्रचंड पोलिस बंदोबस्त होता.
“शेती बचाव देश बचाव, नवीन कृषी विधेयके हाणून पाडा, शेतकरी विरोधी मोदी सरकारचा धिक्कार असो, शेतीचे खाजगीकरण होऊ देणार नाही, सहकार बचाव देश बचाव, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो” अशा कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी संजय चौगुले, बाबुराव कदम, संपत पोवार, संभाजी जगदाळे, प्रशांत आंबी, महेश पांडव,अमोल चंद्रकांत होनकांबळे, राजेंद्र पाटील, सुनंदा शिंदे, राजू देसाई, निखिल चव्हाण, हरीश कांबळे, आण्णा मगदूम,प्रदीप फोंडे, दिलदार मुजावर, बंडू पाटील, अरुण शेंडगे, आरती रेडेकर, कुमार जाधव, मासाई पखाले यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर) , अ.भा.किसान सभा, आम आदमी पार्टी, यासह विविध संघटना सहभागी झाल्या.