जेष्ठ नागरिकांसाठी प्रकाश हॉस्पिटलच्यावतीने मोफत कोविड लस – निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी

   वाळवा व शिराळा तालुक्यातील तसेच मिरज पश्चिम भागातील ज्येष्ठ नागरिकांना प्रकाश हॉस्पिटलच्यावतीने कोव्हीशिल्ड लस मोफत दिली जाणार असून आजपासून त्याचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती, प्रकाश हॉस्पिटलचे संस्थापक – अध्यक्ष व इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले – पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

   ते प्रकाश हॉस्पिटल यांनी ठिकाणी झालेल्या पत्रकार बैठकीत बोलत होते. यावेळी हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक विजय पाटील, मानद सचिव धैर्यशील मोरे, डॉ. प्रदिप कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, डॉ. अभिमन्यु पाटील, डॉ. धैर्यशील पाटील उपस्थित होते.
   निशिकांत भोसले – पाटील म्हणाले, सध्य परिस्थितीमध्ये कोविडच्या पार्श्वभुमीवर लसीकरण सुरू आहे. यासाठी केंद्र शासनाने जिल्हयातील प्रकाश हॉस्पिटलची निवड केली आहे. या हॉस्पिटलमध्ये कोव्हीशिल्ड लस उपलब्ध आहे. हॉस्पिटलच्यावतीने ६० वर्षीय नागरिकांना तसेच ४५ ते ५९ मधील वय असणा-या ज्या लोकांना शुगर, बीपी, ह्दयरोग, पॅरालिसीस व इतर आजार असतील अशा लोकांना ही लस मोफत दिली जाणार आहे. यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
    कोरोना महामारीनंतर वाळवा – शिराळा तालुक्यातील अनेक नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. केंद्र शासनाने या लसीकरता प्रति व्यक्ती २५० रूपये दर सांगितला आहे. मात्र नागरिकांची आर्थिक परिस्थिती बघता ही लस प्रकाश हॉस्पिटलच्यावतीने मोफत दिली जाणार आहे. यासाठी आॅनलाईन नावनोंदणी करावी लागणार असून आधार कार्ड, मतदान ओळख पत्र, पासपोर्ट आदी कागदपत्रे लागणार आहेत. दर दिवशी शंभर पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण होणार आहे. कोव्हीड लॅबची सुविधा या हॉस्पिटलमध्ये असून यासाठी ४९९ रूपये नाममात्र फी आकारली जाणार आहे. दरम्यान जागतिक महिला दिनानिमीत्त दि. ८ मार्च ते ३१ मार्च अखेर महिलांसाठी मोफत आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत.

प्रकाश कुटूंब दत्तक आरोग्य योजनेचा लाभ घ्या.
कोरोना नंतर नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यांना विविध प्रकाराचे आजार व शस्त्रक्रियांवर उपचार करणे कठीण झाले आहे. यासाठी प्रकाश हॉस्पिटलच्यावतीने प्रकाश कुटूंब दत्तक आरोग्य योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेमध्ये वाळवा व मिरज पश्चिम मधील आठ गावे अशा एकूण ११३ गावांचा समावेश आहे. या योजनेत मेडिकल औषधे व लॅब व्यतिरीक्त सर्व सोयी सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी दि. २२ मार्च पर्यंत कुटूंबाची नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करणा-या कुटूंबाला प्रकाश कुटूंब दत्तक आरोग्य योजनेचे कार्ड देण्यात येणार आहे, तरी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष पाटील यांनी केले आहे.

error: Content is protected !!