मातृभाषेतूनच शिक्षण मिळाले तर सर्वसामान्य विद्यार्थी उच्चपदस्थ होईल प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर

      वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काव्यवाचन व प्रश्नमंजूषा कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठी विभागाच्या वतीने ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवसाचे आणि महान संत रविदास यांच्या जयंती चे औचित्य साधून कवी कुसुमाग्रज यांच्या निवड काव्यसंग्रहातील काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘साहित्यिक कुसुमाग्रज व मराठी भाषा’ या विषयावरील प्रश्नमंजूषा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये आयोजित संत रविदास आणि कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित काव्यवाचन कार्यक्रमात कविता सादर करताना महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत पाटील. सोबत मध्यभागी प्र.प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर,प्रा. विठ्ठल सावंत, डॉ. बी.के.वानोळे.
    या निमित्ताने श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकर), प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. सौ.वासंती रासम यांनी शुभेच्छा दिल्या. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,”उच्चशिक्षणाचे माध्यम मातृभाषाच असणे गरजेचे असून मातृभाषेतूनच उच्च शिक्षण मिळाले तर सर्वसामान्य विद्यार्थी उच्चपदस्थ होऊ शकतील असा आशावाद व्यक्त करून त्यांनी मराठी ही एक समृद्ध भाषा असून तिला उज्वल परंपरा लाभल्याचे सांगितले.”

    उपस्थित विद्यार्थ्यांनी, ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा. शिरवाडकर यांचा साहित्यिक प्रवास, मराठी भाषेची उत्पत्ती, मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व, संत साहित्य ते वर्तमान लेखन परंपरेपर्यंत अनेक लेखक, कवींनी मराठी भाषेची समृद्धी वाढल्याचे सांगितले. आज मराठी भाषा माहिती तंत्रज्ञानाची भाषा होत आहे. कोणतीही भाषा संपुष्टात येत नाही तर बोलीच्या अनेक रूपाने व्यक्त होते. त्यासाठी आपण आपल्या अवतीभवती जे- जे पाहतो ते- ते लिहिले, वाचले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
    काव्य वाचनात अनिकेत पाटील, चेतन कोकरे, गौरव मोरे, सानिका इंगवले, नम्रता पाटील, सानिका पोवार, क्रांती कदम, ज्योत्स्ना मोरे, श्रीधर मिस्त्री, विशाल जाधव या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कणा, गर्जा क्रांतीचा जयजयकार, प्रेम, कोलंबसचे गर्वगीत, प्रेम म्हणजे, सूर्य अशा निवडक काव्यवाचनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी प्रा. विठ्ठल सावंत, डॉ. डी. आर. धेडे, प्रा. नितीन कळंत्रे, डॉ. आर. बी.पाटील, प्रा. उमेश जांभोरे, प्रा. कैलास मदने, प्रा.विशाल साळुंखे व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. बी. के. वानोळे यांनी केले.सूत्रसंचालन कु. वैष्णवी जाधव व कु.प्रतिक्षा गिरी हिने केले तर आभार कु. प्रतिक्षा गिरी हिने मानले. डॉ. एस. एस. जाधव, डॉ. बी. के. वानोळे ज्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

.

error: Content is protected !!