सकल मराठा समाज समन्वय समितीचे लाक्षणिक उपोषण ;आम. राजूबाबा आवळे यांना भाषणास मज्जाव

हातकणंगले / दि.५(प्रतिनिधी)
     हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्यावतीने सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर आयोजित लाक्षणिक उपोषणावेळी पाठिंबा देण्यास आलेल्या आमदार राजूबाबा आवळे यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांनी त्यांना भाषण करण्यास मज्जाव करत प्रश्नांचा भडीमार केला.

हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्यावतीने सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

     मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती तात्काळ उठविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत . या मागणीसाठी हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्यावतीने सकाळी अकरा वाजता लाक्षणिक उपोषणास सुरुवात झाली. साडेबारा वाजण्याच्या सुमारास आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आमदार राजूबाबा आवळे यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावली. यावेळी भाषण करण्यासाठी उभे राहताच त्यांना आंदोलकांनी मज्जाव केला.आरक्षणासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे आमदारांनी सांगण्याचा प्रयत्न केला केला . मात्र याच सरकारच्या काळात आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचे सांगत आंदोलकांनी त्यांना निरुत्तर केले.आंदोलनास केवळ तोंडी पाठिंबा न देता मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी लावून धरतानाच जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणतीही शासकीय नोकरभरती करु नये यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. त्यावर आंदोलकांच्या संतप्त भावना सरकारला कळविण्याची ग्वाही देत आमदार आवळे यांनी निरोप घेतला.
सायंकाळी पाच वाजता आंदोलनाची सांगता झाली. प्रास्ताविक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील यांनी केले. यावेळी सचिव भाऊसाहेब फास्के, बी.एम.पाटील, दयासागर मोरे, उपाध्यक्ष दीपक कुन्नूरे, पंडित निंबाळकर, शिरोलीचे माजी सरपंच तात्यासाहेब पाटील, अॅड.संग्रामसिंह निंबाळकर, सुनील काटकर, अमित गर्जे, दत्तात्रय पाटील, पंढरीनाथ ठाणेकर, बी.टी.जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

आमदार राजूबाबा आवळे यांना भाषणास मज्जाव करताना सकल मराठा समन्वय समितीचे कार्यकर्ते

    याप्रसंगी माजी उपसभापती दीपक वाडकर, नगरसेवक दीनानाथ मोरे, अभिजित लुगडे,माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, कोरोचीचे माजी सरपंच सुहास पाटील, सचिनकुमार शिंदे, दत्तात्रय संभाजी पाटील, अजित खुडे, स्वप्निल करडे, प्रल्हाद तालुगडे, अमर वरुटे, राजेंद्र नर्मदे, संजय शिंदे, सुभाष पाटणकर, महादेव शिंदे, सुनील शिंदे, दीपक पोवार, तानाजी शिंदे, अविनाश शिंदे, शितल चव्हाण, सुनील भोसले, संतोष राशिवडे, गजानन खोत, दिलीप खोत, प्रवीण केर्ले, सचिन मोरे, राजू जांभळे, सागर वाडकर, महेश जाधव, शिवाजी वाघरे, बाबुराव जाधव, राजेंद्र सूर्यवंशी, उमेश सूर्यवंशी, शिवाजी पाटील, चेतन जाधव , निशिकांत पाटील आदी उपस्थित होते.
    आंदोलनास हातकणंगले पंचायत समितीचे सभापती महेश पाटील, हातकणंगले नगराध्यक्ष अरुण जानवेकर, नगरसेवक मयूर कोळी, रिपाइंचे अनिल कांबळे यांनी पाठिंबा दिला.

error: Content is protected !!