विद्यार्थी केंद्री अभ्यासक्रमाची गरज: डॉ. मंथा

घोडावत विद्यापीठाचा 5 वा दीक्षांत सोहळा संपन्न

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थी केंद्री अभ्यासक्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन एस.आय सी टी चे माजी अध्यक्ष डॉ.एस.एस.मंथा यांनी केले. ते 29 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या 5 वा दिक्षान्त सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


ते पुढे म्हणाले,की या स्पर्धात्मक युगात टिकायचं असेल तर तंत्रज्ञानातील बदलांना स्वीकारून पुढे जावे लागेल.विद्यार्थ्यांनी अपयशाला न घाबरता येणाऱ्या अडचणीला सामोरे गेले पाहिजे.शैक्षणिक संस्थांनी अध्ययन-अध्यापन पद्धतीमध्ये बदल करायला हवा असेही ते यावेळी म्हणाले.
दीक्षांत संचलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कुलगुरू प्रो. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. विद्यापीठातील विविध विभाग व त्यांचे उपक्रम याविषयीची सविस्तर माहिती दिली.तसेच विद्यापीठाच्या भविष्यकालीन योजना,सुरू करण्यात येणाऱ्या नवीन अभ्यासक्रमाबद्दल सांगितले.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन क्षेत्रात विद्यापीठाच्या होत असलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.परदेशातील विद्यापीठांबरोबरील सामंजस्य कराराबाबत त्यांनी माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगतात संजय घोडावत विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले,की शैक्षणिक जीवनातून तुम्ही प्रॅक्टिकल जीवनात प्रवेश करत आहात.यामध्ये सकारात्मक विचाराबरोबरच कृतिशीलता गरजेची आहे. ध्येय निश्चित केल्यानंतर त्याचा ध्यास घ्यायला हवा त्यासाठी अविरत मेहनत करणे गरजेचे आहे. आई वडील गुरु यांचा सन्मान ठेवायला हवा.स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे आहे त्यासाठी नवीन येणाऱ्या बदलांना स्वीकारून टीम सोबत काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.पदवी प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या दीक्षांत सोहळ्यात 882 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावर्षीचा प्रेसिडेंट पुरस्कार कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागातील मुकित मुनीर याने पटकावला. तसेच विद्यापीठाच्या विविध विभागातील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दोन संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ.एन के पाटील व उप परीक्षा नियंत्रक डॉ.सरिता पाटील यांनी परीक्षा विभागाच्या वतीने पदवी अहवालाचे वाचन केले.यावेळी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य,बोर्ड ऑफ कौन्सिलचे सदस्य, विश्वस्त विनायक भोसले ,कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, सर्व डिन,प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!