शिरोली /वार्ताहर
ओएलएक्स ॲपवरील जाहीरात पाहून अशोक लेलॅन्ड माल वाहतूक ट्रक खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाची सत्तर हजार रूपयाची पिशवी अज्ञातानी हिसकावून पळवली. फसवणुक धारकांचे नांव चिंतामणी संजय मडीवाळ वय (वर्षे ३१, रा. मजरेवाडी ता. शिरोळ) असे आहे . ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गानजीक शिये फाटा येथे घडली असुन घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि ,ओएलएक्स ॲपवरती अशोक लेलॅन्ड जूना चारचाकी माल वाहतूक ट्रक विक्रीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. चिंतामणी मडीवाळ यांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला . त्यावेळी समीर नामक व्यक्तीने आपण एजंट असल्याचे सांगितले . त्याने गाडी बघण्यासाठी शिये फाटा येथील श्रीराम फायनान्स कंपनीच्या गोडावूनजवळ येण्यास सांगितले.
मडीवाळ शिये फाटा येथे आल्यानंतर त्यांची तिघेजण वाट पाहत थांबलेले होते. तिघापैकी एकाने त्यांच्याबरोबर चालत खांद्यावर हात ठेवला व बोलत बाजूला जाताना सोबत असलेल्या दोघांनी त्यांच्याकडील सत्तर हजार रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली . व पल्सर मोटर सायकलवरुन कागलच्या दिशेने सुसाट वेगाने गेली . घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली असुन पुढील तपास फौजदार अतुल लोखंडे करीत आहेत.