मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड

   ज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. गेली पन्नास वर्षे त्यांनी मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून मनोरंजन करण्याचं काम केलं. अगबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांनी बबड्याचे आजोबा ही भूमिका निभावली.

   १९७१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अशा असाव्या सुना’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. ‘सिंहासन’, ‘उंबरठा’, ‘बिनकामाचा नवरा’ ते अगदी अलीकडचा ‘हरी ओम विठ्ठला’ हे पटवर्धन यांचे चित्रपट. जवळपास १०० मराठी चित्रपटांतून त्यांनी काम केले आहे. एन. चंद्रा यांच्या ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘तेजाब’, ‘नरसिंहा’, ‘हमला’ हे आणि इतर अनेक चित्रपट केले. व्ही. शांताराम यांच्या ‘झंजार’ या चित्रपटात त्यांना एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली होती.

    भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका भूमिका मिळत गेल्या असल्या तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. दूरदर्शनवरच्या ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या आणि अमाप लोकप्रियता मिळालेल्या ‘गप्पागोष्टी’मुळे पटवर्धन यांचा चेहरा घराघरांतला पोहोचला. यातील त्यांनी साकारलेला ‘वस्ताद पाटील’ प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहतील. सहाव्या वर्षी रवी पटवर्धन यांनी नाटकात पाऊल ठेवलं होतं. १९४४ मध्ये झालेल्या नाट्यमहोत्सवात त्यांनी एका बालनाट्यामध्ये भूमिका केली होती. या नाटट्यमोत्सवाचे अध्यक्ष होते बालगंधर्व तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत आहेत. वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले.

   वयाची ८० वर्ष पार करुनही त्यांनी अविरत काम केले. रवी पटवर्धन हे आजच्या कलाकारांसमोर आदर्श आहेत. एकाच साच्याच्या भूमिका न करता त्यांनी वैविध्य ठेवले आणि म्हणूनच त्यांची ओळख टिकून राहिली. सिने नाट्य सृष्टीतील एक मराठमोळे भारदस्त आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून गेले,’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

error: Content is protected !!