रुकडी / प्रतिनीधी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत रुकडी गावातील नऊ पाणंद रस्ते बसवुन रस्ते न करताच सत्तरा लाख रुपयांची रक्कम काम पुर्ण झाल्याचे दाखवुन हडप केल्याची घटना उघडकीस आली आहे.

रुकडी (ता. हातकणंगले ) येथील पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधीनी हस्तकाकरवी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रोजगार हमी योजनेतील रक्कम वसुल केली असुन तक्रारी नंतर माञ हा सदस्य तो मी नव्हेच अशी भुमिका पार पाडत आहे. या बाबत शेतकरी पांडुरंग बनकर यांनी तक्रार केली असुन त्यांनी रस्ते न झाल्यास तीव्र अंदोलनाचा इशारा दिला आहे.
रुकडी येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन नऊ पाणंद रस्ते मंजुर केले असुन शेतकऱ्यांनी जॉब कार्ड काढावे . आणि बँक पासबुक जमा करण्याचे आवाहन पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधीनी केले होते. त्यासाठी मगदुम पाणंद ,सुतार पाणंद ,देसाई पाणंद ,समाधी पाणंद ,रींग रोड ,माणगांव वसगडे पाणंद ,बारबाई पाणंद ,कार्पोरेशन पाणंद ,गणेश नगर या पाणंद रस्त्यांना ग्रामपंचायतची मंजुरी आणि ठराव घेण्यात आला. वर्षानुवर्षे रखडलेले शेतीकडे जाणारी पाणंद रस्ते होणार असल्याने संबंधीत भागातील तीनशेहुन अधिक शेतकऱ्यांनी तात्काळ जॉब कार्ड काढुन बँक पासबुकचे झेरॉक्स जमा केले. प्रत्यक्षात मात्र या नऊ पाणंद रस्त्यावर दोन ते चार डंपरंचं मुरुम टाकुन रस्ते पुर्ण झाल्याची कागदपञे बनवण्यात आली. कापसे पाणंद रस्त्याला ग्रामपंचायतची मंजुरी नसतानाही त्यावर रक्कम उचलल्याची चर्चा सुरु आहे. प्रत्येक जॉब कार्ड धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर 242 रुपये प्रतिदिवस प्रमाणे सहा दिवसाचे 1428/- रुपये जमा झाले. एकुण 17 लाख 85 हजार रुपये जमा झाले होते. मात्र पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधीनी दोन हस्तकाकरवी जमा झालेली सर्व रक्कम रस्ते करतो असे सांगुन काढुन घेतली. प्रत्यक्षात मजुराकरवी रस्ता करुन घेणेचे असताना मजूराकरवी अथवा मशिननेही रस्ता मात्र केलाचं नाही. सदस्याने माञ रक्कम हडप करुन कागदपञात माञ प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच अडकवले आहे. पंचायत समिती कडील रेकॉर्डमधील बिला मध्ये आणि ग्रामपंचायत कडील रेकॉर्डमधील बिला मध्ये प्रचंड तफावत दिसत आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी ,मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद , गटविकासअधिकारी ,बांधकाम विभाग यांना लेखी निवेदन दिले आहे. मात्र अधिकाऱ्यांनी सुद्धा याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. ही पाणंद रस्ते न झाल्यास एक हजार हुन अधिक शेतकऱ्यांचा ऊस ऐन हंगामात शेतातच अडकुन कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पविञ्यात आहेत.
