शिरोळ तालुक्यातील चार गावांचा होणार ड्रोन द्वारे सिटीसर्वे -मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

जयसिंगपूर / प्रतिनिधी
     केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामीण भागामधील ज्या गावांचा सिटीसर्वे अद्याप झाला नव्हता अशा सर्व गावांचा सिटीसर्वे आता ड्रोन द्वारे केला जाणार असून शिरोळ तालुक्यातील जैनापुर, तेरवाड, बस्तवाड व तमदलगे या चार गावांचा ड्रोनद्वारे सिटी सर्वे होणार असल्यामुळे या गावातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची अडचण दूर होणार आहे .
    सिटीसर्वे झाला नसल्यामुळे या गावातील नागरिकांना सिटीसर्वेचा उतारा मिळत नव्हता . त्यामुळे बँकांकडून कर्ज घेणे अथवा इतर शासकीय योजनांमध्ये अनेक अडचणी येत होत्या . या निर्णयामुळे अनेक अडचणी आता दूर होणार आहेत , अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी दिली.
     सर्वेमुळे गावठाण मधील मालमत्तांचे निश्चितीकरण होणार असून मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड व नकाशे मिळतील, संबंधितांना प्रॉपर्टीवर कर्ज घेणे सुलभ होईल, त्या त्या गावातील ग्रामपंचायतीच्या मिळकती, सरकारी मिळकती, रस्ते, भूखंड यांच्या हद्द निश्चिती मुळे विकास कामांना गती मिळणार असून या गावांची पत वाढली जाणार आहे असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले. शासनाच्या ग्रामविकास विभाग, महसूल विभाग व भूमी अभिलेख विभाग यांच्यावतीने या सर्वे चे काम पूर्ण होणार आहे.

error: Content is protected !!