सायकलवरुन कोरोनाबाबत जनजागृती करणारा अवालिया ; १३०० किमी प्रवासाने युवकांना प्रोत्साहन

बोरपाडळे /प्रतिनिधी
   कोरोनाने जगावर महाभयानक महामारीची आपत्ती आणली आहे. होत्याचे नव्हते करणारा रोग अनेकांच्या मनात धास्ती निर्माण करणारा ठरला आहे. पण याचा धसका न घेता काही कोरोना-योद्धे पुढे येत विविध उपक्रम हाती घेताना दिसत आहेत. यामध्ये डॉक्टर्स, पोलिस, आशासेविका, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवक सर्वजण लढत आहेत. काहीतर वेगळे उपक्रम राबवत कोरोनाची जनजागृती करताना दिसत आहेत.
    पन्हाळा तालुक्यातील शहापूर येथील ४५ वर्षीय अनिल हिंदुराव मोरे हे शिक्षक, पत्रकार आणि कोरोना संदर्भात प्रबोधन करत आहेत. हे सारे सांभाळत त्यांनी सध्याच्या बिकट परिस्थितीत स्वतःची काळजी घेत सायकलिंगचा छंद जोपासला आहे. कोरोनाबाबतची जनजागृती ते सायकल वरून फिरून करीत आहेत.

         फोटो – अनिल मोरे, वारणाशहापूर

    गेल्या महिनाभरात त्यांनी बोरपाडळेसह, माले, केखले, जाखले, पोखले, कोडोली, वारणानगर, चिकुर्डे, अमृतनगर, मांगले, सातवे, आरळे, सावर्डे, पैजारवाडी, वाघबीळ,आणि जोतिबा डोंगर अशा विविध गावात भेटी देवुन प्रबोधन केले आहे.
गेल्या महिनाभरात सुमारे ५५० किमीचा सायकल प्रवास पूर्ण केला आहे. दररोज ते २० ते २५ किमी प्रवास करत जे भेटतील त्यांना कोरोनाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करतात. तसेच त्यांनी गेल्यावर्षी मे महिन्याच्या सुट्टीत ७५० किमी केला असून त्यांच्या या सायकल प्रवासाबद्दल परिसरात चर्चा सुरू आहे. त्यांच्या या प्रेरणेने परिसरातील अनेक युवक, शिक्षक आदि लोक सायकलिंगकडे वळले आहेत.जे मित्र किंवा पाहुणे भेटतील त्यांना स्वतःची काळजी घेत सायकलिंग व कोरोनाची माहिती देतात. त्यांची प्रशासनाला कोरोना महामारी काळात मदत होत असून पत्रकारितेतूनही ते सामाजिक भावना जपतात .
    सध्या “माझ घर..माझी जबाबदारी” अभियानात ते सहभागी असून यामध्येही त्यांची सक्रियता महत्वाची आहे. सोशल डीस्टन्सिंग ठेवणे, मास्कचा सर्रास वापर, वारंवार हात स्वच्छता करणे, गर्दीतील संपर्क टाळणे, आजारी असल्यास दवाखान्यात जाणे आदि सूचना देत आहे.

error: Content is protected !!