गारगोटी /आनंद चव्हाण
कोरोना संसर्ग कमी होत असलेने लोकांमध्ये उत्साह असून त्यातच दिवाळी सण दहा दिवसांवर आलेने भुदरगड तालुक्याची मुख्य बाजारपेठ असणारी गारगोटी बाजारपेठ सजली आहे, बाजारपेठेत सध्या दिवाळीची खरेदी जोरदार सुरू आहे.

गेल्या आठ महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन, जनता कर्फ्यू , त्यातच संचारबंदी यामुळे सारी जनता त्रस्त होती, जनतेला मुक्त संचार करणे अवघड होऊन बसले होते, पण गेल्या महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे, त्यातच दहा दिवसांवर दिवाळी सारखा मोठा सण असलेने खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत आहेत,
दिवाळी सणाला सर्व सणांचा राजा म्हटले जाते, बाजारपेठेत सर्वच वस्तुंची खरेदी विक्री होते, खरीप पिकांची सुगी नुकतीच संपलेली असते, शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे खेळत असतात, शिवाय अनेक साखर कारखान्यांनी उसाच्या बिलाचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेला आहे, शिवाय जिल्हा दूध संघाने सुद्धा दूध उत्पादकांना भरघोस बोनस दिला आहे, बोनसची रक्कम नुकतीच जमा झाली आहे, दूध संस्था, सेवा संस्था तसेच इतर संस्थांनी सभासदांना दिवाळीनिमित्त लाभांश दिला आहे, त्यामुळे लोकांच्या हातात सध्या पैसा आलेला आहे. याचाच लाभ विक्रेते घेण्याच्या तयारीत आहेत.
ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी अनेक कंपन्यांनी भरघोस सूट तसेच एका वस्तूवर एक वस्तू मोफत असे धोरण अवलंबले आहे, शिवाय किराणा, बेकरी ,स्टेशनरी, कपड्याच्या दुकानदारांनी आपली दुकाने मंडप टाकून सजवली आहेत,
या स्टेशनरी दुकानापुढे आकाशकंदील, पणत्या, सुवासिक साबण, अत्तर, उटणे, उदबत्ती, कपूर, तर किराणा दुकानापुढे मैदा, साखर, रवा, हरभरा डाळ, खाद्य तेल यांची मांडणी करणेत आली आहे, तर इलेक्ट्रिक दुकानापुढे लायटिंग माळा, झुंबर मांडण्यात आले आहेत.तर कापड दुकानदारांनी आपल्या विविध नमुन्यातील कपडे दुकानाबाहेर लावून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.मोबाईल दुकानदारांनी मोबाईल खरेदीवर नवनवीन ऑफर देऊ केल्या आहेत, मोबाईल दुकानदारांनी आपली दुकाने मोठ्या प्रमाणात सजवली आहेत, बाजारात दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती.
भुदरगड तालुक्याचे बाजाराचे मुख्य केंद्र गारगोटी
भुदरगड तालुक्याचे मुख्यालय गारगोटी असून गारगोटी येथे तालुक्यातील १०७ गावांतील लोकांबरोबरच आसपासच्या आजरा, राधानगरी,कागल येथील लोक बाजारासाठी येतात, त्यामुळे या गारगोटी बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. त्यामुळे दुकानदारांनी आपली दुकाने मोठ्या प्रमाणात सजवली आहेत.