ग्रामपंचायतीचे बनावट शिक्के उघडकीस ,फायनान्स कंपनीतील युवकाचा समावेश ,कर्जाच्या एनओसीसाठी उपद्व्याप

जयसिंगपूर / प्रतिनिधी
    संभाजीपूर (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीचे डुप्लिकेट शिक्के तयार केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी उघडकीस आला. शिरोळ तालुक्यात बनावट नोटांच्या अवघ्या चार दिवसांच्या अंतरावर बनावट शिक्क्यांचा प्रकार उघडकीस आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यामागे मोठी टोळी कार्यरत असलेची शक्यता वर्तवली जात आहे.
   अवघ्या चार दिवसांपूर्वी शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरात बनावट नोटांसह साहित्य सापडल्याने हादरून गेले असताना बुधवारी सायंकाळी जयसिंगपूर लगत असणाऱ्या संभाजीपूर ग्रामपंचातीचे बनावट शिक्के तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे
   याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संभाजीपूर ग्रामपंचायतीचे काही शिक्के बनविण्याकरता जयसिंगपूर शहरातील एका शिक्के बनविण्याच्या दुकानात ग्रामपंचायतीचा शिपाई गेला असता.सदर दुकानदाराने चार दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीची तयार करून नेलेल्या शिक्क्याचे पत्र अजुन का दिला नाही अशी विचारणा केली. या वेळी शिपायाने यापूर्वी आम्ही ग्रामपंचातीचे शिक्के तयार करण्यास दिले नसल्याचे सांगितले व सदरचा प्रकार ग्रामसेवकांच्या कानावर घातला.
यावेळी ग्रामपंचायतींचे काही सदस्यांसह ग्रामसेवक त्या दुकानात गेले असता अज्ञाताने डुप्लिकेट शिक्के तयार केलेले उघडकीस आले. त्यावेळी सर्वांनी जयसिंगपूर पोलिसांत धाव घेतली. उमळवाड (ता.शिरोळ) येथील फायनान्स कंपनीचे काम करणाऱ्या एका युवकाबरोबर आणखीन चार ते पाच जण या टोळीत असलेची शक्यता आहे.
   फायनान्स कंपनीच्या कर्जासाठी ना हरकत दाखला व इतर कामांकरिता या डुप्लिकेट शिक्क्यांचा उपयोग केला जात असल्याचे घटनास्थळावरून बोलले जात होते. रात्री उशिरापर्यंत या घटनेची कसून चौकशी सुरू होती. मात्र या घटनेची नोंद उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली नव्हती. 

error: Content is protected !!