शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ होणार – मंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर )

मुंबई / प्रतिनिधी
   राज्यातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ होणार आहे. यासंदर्भात राज्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर ) यांनी आपली सकारात्मक भूमिका स्पष्ट करीत प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळाकडे पाठविला असून, त्यास मान्यता मिळाल्यावर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील हजारो निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.

    राज्यात मुंबई, नागपूर, नांदेड आणि उस्मानाबाद अशी चार शासकीय आयुर्वेद महाविद्यालये असून यातील पदव्युत्तर विद्यार्थी निवासी योजनेंतर्गत सेवा बजावत आहेत. राज्यातील शासकीय वैद्यकीय ,दंत ,आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांना विद्यावेतन दिले जाते. तसेच त्यात दर तीन वर्षांनी वाढ करण्यासंबंधी आढावा घेण्यात येतो. मात्र मे २०२०मध्ये आयुर्वेद वगळता केवळ शासकीय वैद्यकीय ,दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांना रुपये दहा हजार विद्यावेतन दिल्याने शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील हजारो निवासी डॉक्टरांना प्रतिमाह रुपये ५००० हजार एवढ्या विद्यावेतनात काम करावे लागत होते. त्यामुळे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील हजारो निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता.
    याबाबत शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील हजारो निवासी डॉक्टरांनी आपली कैफियत राज्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री यड्रावकर यांच्याकडे मांडली होती. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री यड्रावकर यांनी आपली सकारात्मक भूमिका स्पष्ट करीत यातून लवकरच तोडगा काढण्याचे संकेत दिले होते. अखेर सदर प्रस्ताव राज्यमंत्रीमंडळाकडे पाठविण्यात आला असून राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडेही याबाबत चर्चा सुरू आहे. त्यास मान्यता मिळाल्यास शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील हजारो निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
    राज्यमंत्री यड्रावकर यांच्यामाध्यमातून झालेल्या या निर्णयामुळे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील हजारो निवासी डॉक्टरांना दिलासा मिळणार आहे. तसेच राज्यमंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर शासकीय वैद्यकीय ,दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांप्रमाणेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील हजारो निवासी डॉक्टरांना प्रतिमाह रुपये १० हजार एवढे विद्यावेतन मिळणार आहे.

error: Content is protected !!