वडगांव / प्रतिनिधी
मागील सात दिवसापासुन महावितरण कंपनीने कंत्राटी कामगार यांना कंत्राटदाराची कराराची मुदत संपल्याने कामावरून कमी केले आहे. त्यामुळे खोचीसह परिसरातील अनेक वीज ग्राहक आपल्या समस्यांचे निरसन करण्याच्या प्रतिक्षेत आहेत.खोची, बुवाचे वठार, नरंदे या तीन गावासाठी बुवाचे वठार येथे शाखा कार्यालय आहे. या ठिकाणी एक इंजिनिअर,एक लाईनमन् व १० वीज कर्मचारी आहेत. त्यातील इंजिनियरचा चार्ज हा अतिरिक्त आहे. तर लायनमन व तीन तंत्रज्ञ हे कायमस्वरूपी आहेत. इतर ७ कर्मचारी कंत्राटी आहेत. यामध्ये एक कर्मचारी कंत्राटी असून तो जुना न्यायप्रविष्ट असल्याने व अप्रेंटिससाठी आलेला एक कर्मचारी वगळता पाच कर्मचारी बंद झाले आहेत.
नंरदे येथे चार कर्मचारी असतात. त्याठिकाणी सध्या तेथे दोनच कर्मचारी कार्यरत आहेत. खोची येथे तीन कर्मचारी कार्यरत असतात. त्यातील एकच कर्मचारी सध्या कामावर आहे. पण हा कर्मचारी मध्यंतरी अपघात झाल्याने रजेवर होता. तो सध्या रुजू झाला आहे. पण त्याला पोलवरील, तसेच अवघड काम करता येत नाही. बुवाचे वठार येथे लाईनमन व तीन कर्मचारी कार्यरत असतात. तेथे सध्या लाईनमन आजारी असल्याने रजेवर आहे. एक कंत्राटी कर्मचारी बंद झाला आहे. येथे सध्या एक कायमस्वरूपी कर्मचारी व एक अप्रेंटिस कर्मचारी कार्यरत आहेत.
बुवाचे वठार शाखा कार्यालय अंतर्गत येत असलेल्या खोची, बुवाचे वठार, नरंदे या गावात हजारो घरगुती वीज कनेक्शन ग्राहक आहेत. तसेच या गावांना मोठ्या प्रमाणात बागायती शेती असल्याने हजारो विद्युत पंप धारक, अनेक पाणीपुरवठा संस्था ग्राहक आहेत. त्यामुळे घरगुती वीज ग्राहक, शेती विद्युत पंप ग्राहक यांच्या दररोज वीज पुरवठा बाबत अनेक तक्रारी असतात. यामध्ये वीज पुरवठा खंडित होणे, तारा तुटणे, फ्यूज जाणे आदींचा समावेश असतो. वरील गावात सर्व कर्मचारी कार्यरत असले की ते दररोजच्या दररोज तक्रारींचे निरसन करत होते.
पण गेले पाच दिवस झाले कंत्राटी कर्मचारी कमी झाल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांच्या समस्यांचे निरसन करणे अडचणीचे होऊ लागले आहे.यामध्ये अनेक ठिकाणच्या तक्रारी प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास होत आहे.तसेच फ्रिज,टीव्ही,फॅन बंद राहत असल्याने नाहक त्रासाबरोबर बरोबर आर्थिक नुकसानालाही सामोरे जावे लागत आहे.तसेच सध्या उन्हाळा असल्याने शेतीसाठी पाणीपुरवठा होत असलेल्या विद्युत पंपाच्या तक्रारी शिल्लक राहत असल्याने पिकांना पाणी देणे बळीराजाला त्रासाचे होऊ लागले आहे.त्यामुळे महावितरण वीज कंपनीने सदर ठिकाणी कर्मचारी कार्यरत करून तक्रारींचे निरसन करावे व वीज पुरवठा सुरळीत ठेवावा,अशी मागणी वरील गावातील वीज ग्राहकातून होत आहे.
खोची येथील एका घरगुती वीज ग्राहकाची दोन दिवस झाले लाईट बंद आहे. हा ग्राहक आजारी आहे. त्यामुळे त्याला वीज नसल्याचा त्रास होत आहे. मार्च महिन्यामध्ये महावितरण कंपनीने लाखो रुपयांची थकीत वीज बिले वसूल करून घेतली. त्यामध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता.हे कर्मचारी तक्रारीचे निरसन पण लगेच करत होते. पण त्यांना वसूल होताच कामावरून कमी केल्याने आम्हाला त्रास होत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात दोन दिवस खंडित वीज पुरवठ्याला सामोरे जावे लागले,असे सांगितले.
दीड दोन महिन्यापूर्वीच कंत्राटी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांची मुदत संपली आहे. सदरची निविदा ही जुन्या व नव्या कंत्राटदारांच्या वादात अडकली आहे.त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नव्याने नेमणूक झालेली नाही. पण महावितरण कंपनीने मार्च महिन्यापर्यंत कंत्राटी कामगारांना कामावर ठेवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची थकित वीज बिले वसूल करून घेतली आहे. व त्यांना एप्रिलच्या १ तारखेपासून बंद केल्याने महावितरण कंपनीने आपला स्वार्थ साधून घेतला आहे.