हिरव्यागार कोल्हापूरसाठी आत्मीयतेने काम करणारा निसर्गप्रेमीची कथा
हिरवाई हा शब्द आठवला की आठवण येते अरविंद उर्फ आबा देशपांडे यांनी उभा केलेल्या हिरव्या गर्द झाडीच्या साम्राज्याची. दहा वर्षापूर्वी निसर्ग संगोपनाच्या इच्छेने प्रेरित होऊन आबा देशपांडे यांनी वृक्षारोपणाची सुरुवात केली. दिवसेंदिवस त्यांच्या समाजकार्याला अनेक हात जोडत गेले. गेली दहा वर्ष अविरतपणे आंबा, चिंच, पेरू, वड, पिंपळ, कांचन, बकुळ, कडुलिंब, पारिजातक यासारख्या अनेक झाडांची लागवड यांनी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात केली आहे.
खरंतर वृक्ष लागवड करणं ही सध्याची फॅशन आहे पण वृक्ष जगवणं हे खरं कौशल्य आणि खरोखरच वृक्ष प्रेम आहे. आबा देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वृक्ष लावले पण फक्त लावले नाहीत तर उन्हाळा, हिवाळा या ऋतूमध्ये टॅंकरने पाणी घालून त्यांनी लावलेला एक एक वृक्ष जगवला आहे.
श्रमदान श्रेष्ठ मानून आबांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज गेली दहा वर्ष अविरतपणे काम चालू ठेवले आहे. त्यांचे काम बघून विद्यापीठात अभ्यास करण्यासाठी आलेले विद्यार्थी तसेच व्यायामासाठी आलेले स्थानिक नागरिक यांनाही हळूहळू वृक्ष प्रेम होत गेले. त्यामुळे आबांसोबत वृक्ष संवर्धनाच्या कामात हजारो हात सामील झाले.
विद्यापीठात राबवलेली ही संकल्पना आज कोल्हापूरकरांच्या मनात एवढी रुजली आहे, की संपूर्ण कोल्हापूर हिरवगार करण्यासाठी लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण आज पुढे सरसावले आहेत.
वयाने वृद्ध असलेल्या पण विचाराने तरुण असलेल्या या हिरवाईच्या सहकार्याना बघून आज अनेक तरुण झाडं लावण्यासाठी प्रेरित होत आहेत आणि त्यामुळेच गेल्या दहा वर्षांमध्ये यांनी उभा केलेल्या या रोपट्यांची वटवृक्ष भविष्यातल्या पिढीसाठी संस्कारक्षम सावली देण्यास समर्थ आहेत.
आबा देशपांडे व कोल्हापूर हिरवगार करण्याच्या इच्छेने पेटून उठलेल्या वृक्ष प्रेमींना व त्यांच्या कार्याला आम्हा कोल्हापूरकरांचा सलाम…..!!!
शब्दांकन
मनिष कुलकर्णी
संपादक
MSK Digital News