आईने दोन मुलीसह नदीत उडी मारुन केली आत्महत्या ; कारण अद्याप अस्पष्ट

कोल्हापूर / प्रतिनिधी
      आईने दोन मुलीसह पंचगंगा नदीत उडी मारुन आत्महत्या केली. सुनेत्रा संतोष सावळकर (वय ३० रा. इंदिरा बेघर वसाहत, वडणगे, ता. करवीर जि. कोल्हापुर), श्रीशा सावळकर, (वय ११) खुशी सावळकर (वय ६) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली. या दुखदायक घटनेने वडणगेसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असुन खळबळ उडाली आहे. घटनेची नोंद करवीर पोलीसात झाली आहे.

     याबाबत करवीर पोलिसातुन मिळालेली माहीती अशी की , पंचगंगा नदी पात्रात आज सायंकाळी एका महिलेसह दोन मुलीचे मृतदेह तरंगताना नागरिकांना पहायला मिळाले. ही माहीती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळविली . पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन मृतदेहाची ओळख पटवली. मयत सुनेत्रा यांचे पती बांधकाम व्यावसायिक होते. हृदयविकाराने त्यांचे सहा वर्षापूर्वी निधन झाले. पती निधनानंतर सुनेत्रा या खासगी संस्थेत नोकरी करुन कुटुंबाचा उदयनिर्वाह करीत होत्या. ऑफीसला जाण्यासाठी दोन मुलींसह त्या शनिवारी सकाळी घराबाहेर पडल्या. सायंकाळी त्या घरी परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण सुनेत्रा व त्यांच्या मुलींचा शोध मिळाला नाही. त्यानंतर करवीर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंद केली होती. शोध सुरू असताना तिघांचे मृतदेह पंचगंगा नदी पात्रात आढळून आले. या घटनेने वडणगेतील इंदिरा बेघर वसाहतीसह परिसरात शोककळा पसरली आहे . पोलिस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत पण अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही.

error: Content is protected !!