शेतकऱ्यांना मोठा धक्का , इथेनॉलनिर्मितीवर केंद्रानं घातली बंदी

देशात साखरटंचाई (Sugar) होईल, या कारणासाठी उसाचा रस, सिरप आणि साखरेपासून तयार केल्या जाणाऱ्या इथेनॉलनिर्मितीवर केंद्र सरकारने (Central Government) बंदी घातली आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात नव्याने उभारलेले इथेनॉल प्रकल्प (Ethanol Project) अडचणीत येऊन इथेनॉलनिर्मितीला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कारखानदारांसह ऊस उत्पादकांना मोठा धक्का बसला आहे. देशात आणि विविध राज्यांमध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. याचा परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे. यंदाचा ऊस गळीत हंगामा १२० दिवसांऐवजी ८० ते ९० दिवसच होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे साखर उत्पादन घटेल. या अंदाजावर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
कारखान्यांना ‘बी’ आणि ‘सी’ मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. सध्या सिरप, साखर व उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला सर्वाधिक प्रति लिटर ६५ रुपये ६१ पैसे दर आहे. मात्र, याच इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्याने साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्पासाठी खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची परतफेड कशी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ‘बी’ हेवी मोलॅसिस पासून मिळणाऱ्या इथेनॉलला प्रति लिटर ६० रुपये ७३ पैसे, तर ‘सी’ हेवी मोलॅसिस पासून मिळणाऱ्या इथेनॉलला ४९ रुपये ४१ पैसे दर मिळतो.

error: Content is protected !!