आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून इचलकरंजी महापालिकेसह वडगांव आणि हुपरी नगरपरिषदेसाठी 10 कोटीचा निधी मंजूर

आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नांतून इचलकरंजी महानगरपालिकेसाठी विशेष तरतुद योजना अंतर्गत 5.45 कोटी तर वडगांव आणि हुपरी नगरपरिषदेसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत 4.55 कोटी रुपये असा 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या संदर्भातील अध्यादेश गुरुवारी जारी करण्यात आला.

इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी त्याचबरोबर इचलकरंजी लगतच असलेल्या हुपरी आणि वडगांव नगरपरिषदातील विकासकामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्यात यावा यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. राज्याच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आमदार आवाडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यांना यश आले आहे.  या सर्व कामांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनीही प्रयत्न केले.
इचलकरंजी महानगरपालिका आणि हुपरी व वडगांव नगरपरिषद क्षेत्राताील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील विविध 60 विकासकामांसाठी विशेष तरतूद योजना अंतर्गत 5 कोटी 45 लाख रुपयांच्या निधीला मंजूरी दिली आहे. त्याचबरोबर हुपरी आणि वडगांव नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठीसुध्दा निधी उपलब्ध व्हावा म्हणून आमदार आवाडे हे सातत्याने प्रयत्नशील होते. त्यालाही यश मिळून हुपरी नगरपरिषदेच्या 19 कामांसाठी 3.73 कोटी आणि वडगांव नगरपरिषदेच्या 3 कामांसाठी 82 लाख असा 4 कोटी 55 लाखाचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत मंजूर झाला आहे. त्यामुळे प्रलंबित विकासकामांना गती मिळणार आहे. या कामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!