इचलकरंजी /ता :30
शहरातील शासनाचे आयजीएम रुग्णालय सक्षम करण्यासाठी इचलकंजीवाशी असणाऱ्या राज्यातील विविध अधिकाऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले असून या रुग्णांच्या सोयीसाठी प्रत्येक विभागात गरम पाणी मिळावे . म्हणून आम्ही इचलकरंजीकर या समूहाच्या वतीने आज दहा वॉटर डिस्पेंसर देण्यात आले.
मूळ इचलकरंजीवासी असलेले आज अनेक जण राज्यात विविध ठिकाणी अधिकारी म्हणून कार्य करीत आहेत . या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शहरासाठी काहीतरी करण्याचा चंग बांधला . आणि आम्ही इचलकरंजीकर अधिकारी ग्रुप या नावाने कामाची सुरुवात केली. सुरुवातीस घोरपडे नाट्यगृह येथे स्पर्धा परीक्षेसाठी कार्यक्रम घेऊन 1000 मुलांसाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

त्यानंतर महापुरात याच ग्रुपच्या वतीने गरीब आणि गरजू लोकांसाठी तब्बल दोन लाख रुपयाचे विविध वस्तू पूरग्रस्तांना वाटप करण्यात आले होते. यामध्ये चटई चादर जीवनावश्यक वस्तू महिलांसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू यांचा समावेश होता. शहराच्या विविध विकास कार्यात हातभार लावणे . सहकार्य करणे . यासाठीच आयएएस अधिकारी विकास खारगे यांच्या नेतृत्वाखाली हा ग्रुप कार्यरत आहे. यामध्ये राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पालिकेच्या आयजीएम रुग्णालयात आता रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. याठिकाणी शासनाच्या वतीने विविध सोयी सुविधा करण्यात येत आहेत . त्याचबरोबर आम्ही इचलकरंजीकर अधिकारी ग्रुपने यामध्ये एक पाऊल पुढे टाकत दहा वॉटर डिस्पेंसर मशीन रुग्णालयास प्रदान केले आहे. त्यामुळे आता कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 10 वार्डात गरम व गार पाणी उपलब्ध होणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, हातकणंगले येथील शालेय पोषण आहार अधीक्षक प्रवीण फाटक , नगर भूमापन खात्यातील शशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शेटे यांच्याकडे या वस्तू प्रदान करण्यात आल्या. शहरातील विविध संघटना आणि नागरिकांनी रुग्णालयातील सुविधा सोयीसुविधांसाठी एक पाऊल पुढे टाकल्यास नक्कीच गरजू आणि गरीब रुग्णांना या रुग्णालयात अधिकाधिक सोयी उपलब्ध होतील . असा विश्वास श्री रसाळ यांनी यावेळी व्यक्त केला.