नात्यांच्या बंधनातून हरवत चाललेलं “आत्या” नावाचं मायाळू पात्र….

श्री. दिव्यजित [ देवा ] कोठुळे

       आपण सर्व अलीकडचे रक्षाबंधन हे सण अतिशय उत्साहात साजरे करतो. दिवाळी, अक्षय तृतीया आणि रक्षाबंधन हे सण आले म्हणजे साहजिकच सासरी गेलेल्या प्रत्येक माहेरवाशीणला माहेरची ओढ लागते. तिनं कितीही सुखात संसार थाटला असेल तरी तिची माहेरची ओढ ही काही औरच असते.

    माहेरवाशीण म्हटलं तर तिला वयोमर्यादा असूच शकत नाही. माहेरी आज जिचे लेक म्हणून स्थान असते कालांतराने तिचे रूपांतर आत्या मध्ये होते. माहेरी तिची जागा त्याच घरात नव्याने उदयास आलेली [ भावाची मुलगी ] लेक घेते. आणि आत्याचे तिच्याच माहेरी हळूहळू महत्त्व कमी होत जाते.

  मग नव्यानेच लग्न झालेल्या लेकीचा आणि जावयाचा कौतुक सोहळा साजरा होतो. आणि नात्यांच्या बंधनातून आणि माहेरातून आत्या हे पात्र पुसट होत जाते ….

   वास्तविक, आत्या ही खूपच प्रेमळ आणि मायाळू असते. तीचे माहेरच्या घरी खूप मोठे योगदान असते. माहेरच्या पडतीच्या काळात तिने कायम मोकळ्या हाताने मदत केलेली असते. आपल्या भावाच्या पाठीशी नेहमीच ती ठामपणे उभी राहिलेली असते.

   आज आपण म्हणतो की, “जिचे आईवडील गेले तिचे माहेर गेले” हे अतिशय चुकीचे आहे. लेकीचे कौतुक करणे हे जरी गैर नसले तरी कधीकाळी त्याच घराची लेक असणाऱ्या आत्याला आपण का विसरत जातो …. ? विशेषतः उतारवयात तिला माहेरच्या प्रेमाची अन जिव्हाळ्याची गरज असताना नेमक्या त्याच काळात तिला परके केले जाते ….
तिचे आईवडील नसले म्हणजे तिचा माहेरावरचा हक्क संपला का …. ? …. का तिला खरच माहेरची ओढ नसते का …. ? माहेर हे एक असे ठिकाण आहे की शेवटपर्यंत त्याचे आकर्षण संपत नाही ….!!

    काही बोटांवर मोजण्याइतक्या आत्यांचा सन्मान होतही असेल काही घरात पण बहुतांश आत्याचे माहेरी महत्त्व संपलेले दिसते ….!!

    समाजाने मानसिकता बदलायला हवी. प्रत्येक भावाने आपल्या लेकी इतका नसला तरी आपल्या बहिणीचाही यथोचित सन्मान करायलाच हवा ….!! आणि आपल्या येणाऱ्या पिढीलाही आत्याचे महत्व सांगायला हवे ….!! अर्थातच, ती ही तिच्या संसारात खूप मग्न झालेली असते. तिच्याही लेकी माहेरी आलेल्या असतात. पण केवळ ती प्रौढ झाली म्हणून तिची माहेरची ओढ मात्र तसूभरही कमी होत नाही ….!!

    ज्या घरात ती लहानाची मोठी झाली , ज्या अंगणात ती खेळली …. बागडली …. त्याच माहेरात तिला परकं करणं अत्यंत चुकीचं आहे ….!!

      रक्षाबंधनाच्या निमित्ताने सहज हा लेखलिहावा वाटला …. ✍🏻

       यामध्ये, नवीन पिढीत वावरणाऱ्या त्या आत्याच्या भाच्याची भूमिका खूप महत्त्वाची ठरू शकते. त्याने बहिणीइतकाच सन्मान आत्याचाही कारायला हवा ….!!

       कारण , तिलाही माहेरची आशा असते …. अन म्हणतात ना …. “माय मरो पण आशा न मरो ” …..!!

शब्दांकन
श्री. दिव्यजित [ देवा ] कोठुळे….पुणे
WhatsApp No. 98900 45959
Calling No. 98220 45959

error: Content is protected !!