भारत येशाळ खून प्रकरणातील आरोपींना शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश

अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली

हातकणंगले / प्रतिनिधी
कोरोची-हातकणंगले मार्गावर ट्रक मिस्त्री भारत पांडुरंग येशाळ यांच्या खुनाचा शोध घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधातून खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून , गुन्ह्यातील संशयित आरोपींना तेलंगणा राज्यातून ताब्यात घेतले आहे. मिरीयाला यादगिरी महेश (वय – २६ ) गजुला सत्यनारायण शिवशंकर (वय – २७ ) मोहम्मद अमीर महंमद शरीफखान (वय – २४ रा. सर्व श्रीराम कॉलनी पोचमा मंदिरमागे सायराबाद जि. हैदराबाद राज्य- तेलंगणा) अशी संशयीतांची नावे आहेत.


याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मिळालेली माहिती अशी की, मयत ट्रक मिस्त्री भारत येशाळ हा इचलकरंजी येथे ट्रक मेकॅनिकचे काम करत होता. ७ जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ट्रक बंद पडल्याचे बनाव करून कोरोची – हातकणंगले मार्गावरील चव्हाण टेकडी येथे बोलवून धारदार शस्त्राने २१ वार करून खून केला होता. खुनाची घटना हातकणंगले पोलीसांच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आली. खुनाचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसासमोर होते.
संशयित आरोपी मिरियाला महेश हा मयत येशाळच्या पत्नीच्या मामाचा मुलगा आहे. त्याचे व येशाळच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. पत्नीचे अनैतिक संबंध मयत भारत येशाळ याला समजले होते. त्या रागातून येशाळ पत्नीला त्रास देऊन सतत मारहाण करीत होता. पत्नीने पतीकडून वारंवार मारहाण होत असल्याचे तिने आपल्या मामेभावाला सांगितले. त्याच रागातून संशयित आरोपींनी ट्रक दुरुस्ती करण्याचे कारण सांगून हातकणंगले येथील चव्हाण टेकडी येथे दि. ७ जानेवारी रोजी बोलावून खून केला.
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना स्वतंत्र पथक नेमुन गुन्ह्यातील आरोपींना शोध घेण्याचे आदेश दिले. आदेशाप्रमाणे पोलीस उप निरीक्षक शेषराव मोरे , संदीप जाधव पोलिस अंमलदार चंदू ननावरे , राजीव शिंदे , खंडेराव कोळी , शिवाजी जामदार , वसंत पिंगळे , सचिन देसाई , महेश खोत , संजय इंगवले , आयुब गडकरी व रफिक आवळकर यांची तीन तपास पथके तयार केली.
तपास पथकाने वरिष्ठांच्या सुचना मार्गदर्शनाखाली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक व गोपनीय माहितीद्वारे तपास करून संशयित आरोपींना कसोशीने तपास करून सायराबाद , हैदराबाद (राज्य तेलंगणा ) येथून ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी व कारवाईसाठी आरोपींना हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

error: Content is protected !!