मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी

     मागील गळीत हंगामातील उसाचा थकीत १०० रुपये हप्ता तातडीने द्यावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वडगाव - हातकणंगले रस्त्यावर काळे झेंडे दाखवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नऊ कार्यकर्त्यांना वडगाव न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यामध्ये बंडू पाटील, विश्वास बालिघाटे, स्वस्तिक पाटील, अक्षय देसाई, राजू गिड्डु, सुनील खोत, दीपक चौगुले, महावीर चौगुले, श्रीकांत करके यांचा समावेश आहे.

दरम्यान, आश्वासन देऊनदेखील अद्यापही बिले देण्यास मंजुरी न देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून अटकेतील स्वाभिमानीचे कार्यकतें पोलिस कोठडीत रविवारी (ता.१०) एक दिवस अन्नत्याग उपोषण करणार आहेत.

मागील गळीत हंगामातील थकीत बिलापोटी ४०० रुपये द्या, या मागणीसाठी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे-बंगळूर महामार्ग रोखला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मध्यस्थी करून मागील गळीत हंगामातील १०० रुपये बिल देण्याचे जाहीर केले होते. ही रक्कम दोन महिन्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करू, असे साखर कारखान्यांनी लेखी आश्वासन दिले होते; मात्र अद्यापही हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले नाहीत. या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखवले. त्यानंतर रात्री उशिरा नऊ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

error: Content is protected !!