मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात आदर्श गुरुकुल विद्यालय प्रथम

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा निकाल शासनाने आज जाहीर केला. त्यात कोल्हापूर जिल्ह्याला विभागीय पातळीवरच यश मिळविता आले. त्यात पेठवडगाव (ता. हातकणंगले) मधील आदर्श गुरुकुल विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज आणि चंदगड तालुक्यातील विद्यामंदिर तडशिनहाळचा समावेश आहे. शालेय शिक्षण विभागाअंतर्गत राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यपातळीवर मूल्यांकन करण्यात आले. त्यात उर्वरीत इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या गटात आदर्श गुरुकुल विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजने प्रथम क्रमांक पटकविला. या ज्युनिअर कॉलेजला शासनाकडून एकवीस लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा गटात विद्यामंदिर तडशिनहाळने द्वितीय क्रमांक मिळविला असून ते अकरा लाख रुपयांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले आहे. या अभियानाचे बक्षीस वितरण मुंबईतील टाटा थिएटरमध्ये मंगळवारी (ता.५) दुपारी एक वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कोल्हापूर विभागातील अन्य विजेत्या शाळा विभागात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा गटात जिल्हा परिषद आदर्श शाळा मुंढे तर्फे चिपळूण (प्रथम क्रमांक), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे सातारा (तृतीय क्रमांक), तर उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा गटामध्ये गोविंदराव निकम विद्यालय सावर्डे रत्नागिरी (द्वितीय क्रमांक), गुरुकुल प्रायमरी स्कूल सातारा (तृतीय क्रमांक) या शाळा विजेत्या ठरल्या आहेत.

error: Content is protected !!