पैसे लपविण्यासाठी अक्षयने घरात उभारली छुपी खोली, पोलिस चक्रावले

कोल्हापूर : सान्विक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा अटकेतील संशयित अक्षय अनिल कांबळे (वय २९, रा. सादळे, ता. करवीर) याच्या सादळे येथील घराची पोलिसांनी मंगळवारी (दि. २६) झडती घेतली. घरात पैसे ठेवण्यासाठी तयार केलेली छुपी खोली पाहून पोलिस चक्रावले. पाच अलिशान कार आणि बँकेत ठेवलेल्या सुमारे ७६ तोळे दागिन्यांची त्याने मित्रांकरवी विल्हेवाट लावल्याची माहिती तपासातून समोर आली.

अवघ्या चार महिन्यांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक घेणारा अक्षय कांबळे याने लाखो रुपयांची माया जमा केली होती. जग्वार, ऑडी, बीएमडब्ल्यू अशा अलिशान पाच कार त्याच्याकडे होत्या. १०० तोळ्यांपेक्षा अधिक दागिन्यांची खरेदी केली होती. त्याशिवाय काही नातेवाइकांच्या नावे मालमत्तांची खरेदी केल्याचेही चौकशीतून समोर येत आहे.

त्याच्या बँक खात्यांची माहिती पोलिसांना मिळाली असून, मोठ्या रकमांची देवाण – घेवाण कोणाशी झाली, याचा तपास केला जात आहे. त्याची पत्नी आणि आईच्या बँक खात्यांवरून काही संशयास्पद व्यवहार झाले आहेत. त्यांचीही चौकशी करणार असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विशाल मुळे यांनी सांगितले.

पोलिस परतले

कांबळे याच्या घर झडतीदरम्यान रोकड, दागिने, वाहने, किमती वस्तू असे काहीच पोलिसांना मिळाले नाही, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, घरातील एका बेडरुममध्ये कपाटामागे असलेला दरवाजा उघडला असता, तिथे छुपी खोली आढळली. रोकड, दागिने आणि चीजवस्तू लपविण्यासाठी छुप्या खोलीचा वापर केला जात होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

कार, दागिने साथीदारांकडे

आईच्या नावावर बँकेत ठेवलेले ७६ तोळे दागिने शिवाजी पेठेतील एका मित्राने आईवर दबाव टाकून सोडवून नेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले, तर एक कार माकडवाला वसाहतीमधील एका खासगी सावकाराकडे आहे. दुसरी कार शिवाजी पेठेतील एका मित्राकडे आहे. गुंतवणुकीच्या पैशातून घेतलेली सर्व वाहने, दागिने आणि महागड्या वस्तू जप्त करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी तपास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दिशाभूल करण्याचा प्रयत्न

अटकेतील अक्षय कांबळे तपासात पोलिसांना प्रत्येकवेळी वेगळी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. गुन्ह्यातील काही साथीदारांना वाचविण्याचा तो प्रयत्न करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे

error: Content is protected !!