हातकणंगले /ता .१८
आळते (ता.हातकणंगले) गावात आजअखेर तब्बल 66 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असुन त्यातील एक रुग्ण मयत झाला आहे. आज एकाच दिवशी एकाच प्रभागात पंधरा रुग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत. 66 कोरोना बाधित रुग्ण होवुन सुद्धा ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व कोरोना दक्षता समितीने गांभीर्याने कसलीही दखल घेतली नसून आणखी रुग्ण वाढण्याची व मरण्याची वाट बघत आहे काय ? असा सवाल सुजाण नागरिकांतून विचारला जात आहे.
गावातील रुग्णवाढीने ग्रामपंचायतीत व कोरोना दक्षता समितीचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे. गावात मास्कचा वापर सर्रास टाळला जात आहे . तर सोशल डिस्टंन्सचा फज्जा उडाला आहे . कोरोना कृती समितीमध्ये श्रेय वादातून दररोज होणाऱ्या गैरसमजामुळे कामकाजात विस्कळीतपणा दिसत आहे . गावातील व्यवसायिकांना वेळेचे कसलेच बंधन नाही . यामुळे कोरोना संसर्ग थांबणार कसा ? असा प्रश्न सुजाण नागरिकांतून रोजच विचारला जात आहे
गावात आज अखेर एकूण सहासष्ट कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत . त्यामध्ये एक मयत असुन सत्तावीस जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत . तर छत्तीस पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच अलगीकरण केलेले आहे . दोन रुग्णावर घोडावत कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
तब्बल छत्तीस पॉझिटिव्ह रुग्णांना घरातच विलगीकरण केलेले आहे . पण कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी काहीच उपाययोजना केलेली नाही . बाहेरील व्यवसायिकांची सर्रास ये-जा सुरू आहे . दुकानदारासह अन्य व्यवसायिकांना कोणतेही वेळेचे बंधन नाही . तरुणांचे टोळके चौकाचौकात विनामास्क बिनधास्त फिरत आहेत. विनाकारण गावात फिरणाऱ्यांची संख्या वाढली असून गर्दी करु नये . हे कोणालाही समजत नाही . प्रत्येक जण मला काहीच होणार नाही . या अविर्भात फिरत आहे . कोरोना कृती समितीचा गावात कसलाही अंकुश राहिला नाही.
कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी गावात जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे . पण या रुग्णालयातच कोरोनाची लागण झाली आहे . आरोग्य केंद्रातून एकूण अठ्ठावीस कर्मचारीवर्ग कोरोनाविरोधात यंत्रणा राबवीत आहेत . पण गावात कोणाचा पायपोस कोणालाच नसल्याने गावातील कोरोनाचा संसर्ग थांबणार कसा हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून सुजाण नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे .