हातकणंगले /ताः 22
आळते (ता.हातकणंगले) येथे सकाळी आणखी चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत . चारही रुग्ण ता . 21 रोजी बाधित झालेल्या व्यक्तीची मुले ,सून व पुतण्या आहेत . पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी सत्तर ते ऐंशी जणांची यादी तयार केली असून त्यांची आज तपासणी करण्यात येणार असल्याने आळते गावात घबराट पसरली आहे .
ता .२१ रोजी पॉझिटिव्ह रुग्णावर मागील आठ ते दहा दिवसापासून आळते व कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते . त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला घोडावत सेंटर मध्ये दाखल केले आहे . त्यानंतर त्याच्या घरातील सर्वांना क्वारंटाइन करून तपासणी केली असता चार जण पॉझिटिव्ह आले आहेत . तर घरातील अन्य नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह रुग्ण 24 ते 28 वयोगटातील आहेत . सनियंत्रण समिती व ग्रामपंचायतीने गाव पूर्णपणे सील करण्याच्या हालचाली सुरू केल्या असुन गावात निर्जंतुकीकरण औषध फवारणी केली आहे . चार जणांच्या संपर्कात आलेल्यापैकी बहुतांश जण एकाच मंडळातील आहेत . सत्तर ते ऐंशी जणांची स्वॅब तपासणी केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना एका खाजगी शाळेत क्वारंनटाइन करण्यात येणार आहे.
बाधित चौघांपैकी एक युवक कागल येथील एका कंपनीत नोकरीस होता . त्या कंपनीतील अनेकांशी तपासणी करण्याची आहे . दुसरा एक रूग्ण जयसिंगपूर येथील एका नामांकित कंपनीत नोकरीला आहे . त्या कंपनीतील रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची यादी काढण्याचे काम सुरू आहे . संपर्कात आलेल्या व्यक्तींचे कनेक्शन सर्वत्र पसरले असल्याने याचा कोणा -कोणावर परिणाम होणार व किती लोकांची स्वॅब तपासणी करावी लागेल ही चिंतेची बाब बनली आहे .