मनोज जरांगे – पाटील यांची एसआयटी चौकशीमागे घेण्याची सकल मराठा समन्वय समिती शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हातकणंगले तालुक्यात कुणबी दाखले तातडीने देण्याचाही आग्रह

आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे मराठा योद्धे मनोज जरांगे – पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी सकल मराठा समाज हातकणंगले तालुका समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. शिवराज्य भवनच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री आज हातकणंगले दौऱ्यावर आले असता शिष्टमंडळाने त्यांची भेट घेवून चर्चा केली.

हातकणंगले तालुक्यात 8878 कुणबी नोंदी सापडल्या असून दाखल्यांचे वितरण करण्यात अधिकाऱ्यांकडून दिरंगाई होत असल्याकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष्य वेधण्यात आले. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाचा सन्मान करुन समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याऐवजी सरकारने श्री. जरांगे – पाटील यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा लावण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाची ही कृती निषेधार्ह असून मराठा समाजात यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला असून एसआयटी नेमण्याचा निर्णय रद्द करावा.

महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये स्वतंत्र प्रवर्गातून दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेवून तसा कायदाही विधिमंडळाच्या अधिवेशनात एकमताने मंजूर केला आहे, मात्र हा कायदा न्यायालयात टिकणार का याबाबत मराठा समाजाला साशंकता आहे. कारण यापूर्वी तत्कालीन राज्यसरकारांनी दोनवेळा दिलेले आरक्षण न्यायालयाने रद्दबातल ठरवले आहे, ही वस्तुस्थिती होय. तरीही यावेळी दिलेले आरक्षण न्यायालयात कसे टिकणार याबाबत शासनाने विशेष निवेदन जारी करुन स्पष्टोक्ती द्यावी, जेणेकरुन मराठा समाजाला विश्वास मिळेल.
हातकणंगले तालुक्यात कुणबी दाखले वितरित करण्याबाबत शासकीय अधिकारी उदासिन दिसत आहेत. पात्र व्यक्तींना याबाबत समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱऱ्यांवर कठोर कारवाई करावी. मागण्यांबाबत शासनाने गांभीर्याने विचार करुन मराठा समाजाला न्याय द्यावा अन्यथा सरकारविरोधात उद्रेक निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
समितीचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील, उपाध्यक्ष दीपक कुन्नूरे, सचिव भाऊसाहेब फास्के यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात नगरसेवक दीनानाथ मोरे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रताप देशमुख, पंडित निंबाळकर, दयासागर मोरे, सुनिल काटकर, मिलिंद चौगुले, मिथुन जाधव, बी. एम. पाटील, रमेश घोरपडे, आनंदा झपाटे, संतोष ताईंगडे, डॉ. अभिजित इंगवले, संदीप पोवार आदींचा समावेश होता.

error: Content is protected !!