शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर :
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा (मर्या.) मार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सन 2023-24 या वित्तीय वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना सुरु करण्यात येत असून जास्तीत जास्त विद्यार्थी व समाज बांधवांसाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एच. चव्हाण यांनी केले आहे.
सन 1993-94 पासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ हे राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ, दिल्ली (NSFDC) यांची अधिकृत वाहीनी म्हणून कार्यरत आहे. सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ दिल्ली (एनएसएफडीसी, दिल्ली) व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत शैक्षणिक कर्ज योजना सुरु करण्यात येणार असून योजनेचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक कर्ज योजना -कर्जाची मर्यादा देशांतर्गत शिक्षणासाठी रक्कम रु.30 लाखपर्यंत, परदेशांतर्गत शिक्षणासाठी रक्कम रु.40 लाखापर्यंत आहे. वित्त उपलब्धी- महामंडळाने शिफारस केलेल्या अर्जानुसार लाभार्थीनिहाय निधी एनएसएफडीसी यांचेकडून उपलब्ध करुन देण्यात येतो. उत्पन्न मर्यादा ग्रामीण, शहरी भागातील अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रक्कम रु.3 लाखापर्यंत असावे. एनएसएफडीसीचे माहिती पुस्तिकका दिनांक 1 ऑक्टोबर 2023 नुसार देशांतर्गत शैक्षणिक कर्जासाठी महिला लाभार्थींसाठी रु.5.5 टक्के व्याजदर द.सा.द.शे. व पुरुष लाभार्थींसाठी रु. 6 टक्के द.सा.द.शे. व्याजदर आकाराण्यात येईल. परदेशांतर्गत शैक्षणिक कर्जासाठी महिला लाभार्थींसाठी रु.6.5 टक्के व्याजदर द.सा.द.शे. व पुरुष लाभार्थींसाठी रु.7 टक्के द.सा.द.शे. व्याजदर आकाराण्यात येणार आहे. रक्कम रु.10 लाखापर्यंतचे कर्ज परतफेडीचा कालावधी 10 वर्षाचा असेल व रक्कम रु.10 लाखापेक्षा जास्तीचे कर्ज परतफेडीचा कालावधी 12 वर्षाचा असेल. शिक्षण पूर्ण होऊन 6 महिन्यांनी किंवा नोकरी लागल्यानंतर यापैकी जे अगोदर होईल तेव्हापासून या कर्जाच्या परतफेडीची सुरुवात होईल. या योजनेच्या यापूर्वी असलेल्या नियम व अटी लागू राहतील.

error: Content is protected !!