हातकणंगले /ता.३१-प्रतिनिधी

घुणकी व वाठार तर्फ वडगावचे ग्रामविकास अधिकारी अशोक मारुती भोसले (वय-48 वर्षे ) यांचा कोरोनाने मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापासून ते सीपीआरमध्ये उपचार घेत होते. त्यांना 15 ऑगस्टपासून थोडासा ताप येत होता . पण त्यांनी कामाच्या व्यापामुळे दुर्लक्ष केले . दिनांक 24 रोजी त्यांना घोडावत सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते . पण तिथे उपचार अपुरे होत असल्याने सीपीआरमध्ये ठेवले होते . पण त्यांचा आज पहाटे दीडच्या दरम्यान मृत्यू झाला.
भोसले यांचे मूळ गाव येडशी (ता . जि. उस्मानाबाद ) असुन सध्या ते बावडा येथे स्थायिक झाले आहेत . त्यांच्या नोकरीची सुरुवात कागल पंचायत समितीमध्ये 1994 साली झाली . सध्या ग्रामसेवक पतसंस्थेचे विद्यमान संचालक असून ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी होते. ते कंटेनमेंट दक्षता समितीचे काम पाहत होते . त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच हातकणंगले पंचायत समितीमध्ये व घुणकी आणि वाठार तर्फ वडगाव पंचक्रोशीतुन हळहळ व्यक्त होत आहे . त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , मुलगी असा परिवार आहे.
एक उमदा,उत्साही पण तितक्याच हळव्या मनाचा सहकारी आपल्या सर्वांना सोडून गेला . ही गोष्ट मनाला पटत नाही. विश्वासच बसू शकत नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच सर्वांना कळकळीची विनंती आहे.स्वतःची ,कुटुंबाची काळजी घ्या. कोणत्याही आरोग्याच्या तक्रारीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.सहकाऱ्यांशी संवाद साधा.
अरूण जाधव
गटविकास अधिकारी
पंचायत समिती ,हातकणंगले