‘कत्तलखाना हटाव, पंचगंगा बचाव’ मागणीसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा

शहरातील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने सोमवारी प्रांत कार्यालयावर कत्तलखाना हटाव पंचगंगा बचाव मोर्चा काढून नायब तहसिलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महापालिकेच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मोर्चामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह महिलांची संख्या लक्षणीय होती.

इचलकरंजी शहरातील ‘इचलकरंजी अॅग्रो फूडस् अॅण्ड ग्बामा एन्टरप्रायझेस’ या कंपनीचा कत्तलखाना सुरु असून त्यामुळे पंचगंगा नदी पात्रात प्रदुषण होत आहे. प्रदुषणास कारणीभूत ठरणारा हा कत्तलखाना त्वरीत बंद करावा. प्रदुषणाबाबत कोणतेही नियम पाळत नसताना प्रदुषण मंडळ कारवाई का करत नाही, अशी विचारणा करत प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले, तसेच कत्तलखान्याचे रक्त आणि मांसमिश्रीत सांडपाणी विनाप्रक्रिया पंचगंगा नदीत सोडले जाते. पंचगंगेचे हेच पाणी पुढे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे मिसळते. त्याच पाण्याने पवित्र दत्तात्रेयांच्या पादुकांना अभिषेक होतो आणि भाविकही त्यातच स्नान करतात. त्यामुळे भाविकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोचत आहे.

त्यामुळे सदरच्या कत्तलखाना १५ दिवसात बंद करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी केली. सदर मोर्चाची शिवतीर्थापासून सुरुवात करण्यात आली.मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणिय होता. यावेळी जय श्रीराम, हर हर महादेव यासह महापालिकेचा धिक्कार असो या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी संतोष कोळी उर्फ बाळ महाराज, शिवसेनेचे मोहन मालवणकर, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यांनी महापालिका व प्रदूषण मंडळाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. मोर्चामध्ये आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील, आनंदा मकोटे, किरण दुसे, प्रसाद जाधव, शेखर सुखंडे, संतोष सावंत, सुजित कांबळे, बाळासाहेब ओझा यांच्यासह महिला व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!