आवाडे जनता बँकेला ५४ कोटींचा उच्चांकी नफा- अध्यक्ष स्वप्निल आवाडे

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने सभासद, ठेवीदार व ग्राहकांचे सहकार्य व विश्वासामुळे नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण ४२५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यामध्ये २५५० कोटी रुपयांच्या ठेवी तर १७०० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचा समावेश आहे. बँकेचे भागभांडवल ७१ कोटी इतके झाले आहे. आर्थिक तरतुदीपूर्वीच उच्चांकी असा ५४ कोटी रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांनी दिली. ते म्हणाले, बँकेचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे व आ. प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची चौफेर व यशस्वी घोडदौड सुरू आहे. बँकेकडून बदलत्या काळानुरूप सभासदांना सर्व अत्याधुनिक सुविधा पुरवल्या जात आहेत. जागतिक मंदी व निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीतही बँकेचा प्रगतीचा आलेख कायम आहे.

गतवर्षीच्या तुलनेत ढोबळ एनपीएचे प्रमाण ८ टक्के व दीड टक्के निव्वळ एनपीएचे प्रमाण यंदा बँकेने राखण्यात यश मिळवले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नवीन धोरणानुसार ५० टक्के कर्ज २५ लाखाच्या आतील करणे बंधनकारक करीत मार्च २०२४ पर्यंत हा कर्जपुरवठा करण्याबाबत सूचित केले होते. यासूचनेचेही बँकेने यथोचित पालन केले आहे. बँकेने समाजातील प्रत्येक घटकास कर्ज योजनांचा लाभ मिळावा, या हेतूने अनेकविध कर्ज योजना सुरू केल्या असून त्याला मोठा प्रतिसाद आहे. नवीन पलूस व बोरगाव शाखेचीही यशस्वी घोडदौड सुरू आहे.

ठेवीदारांचा बँकेवरील विश्वास, कर्जदारांनी बिकट परिस्थितीत वेळेत केलेली परतफेड, सभासद, ग्राहक यासह बँक परिवाराच्या अथक परिश्रमामुळेच बँक प्रगतिपथावर असल्याचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सी. ए. संजयकुमार अनिगोळ, बीओएमचे अध्यक्ष सीए चंद्रकांत चौगुले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे, संचालक महेश सातपुते, बाबुराव पाटील, बंडोपंत लाड, रमेश पाटील, सीए मनोहर जोशी, अॅड. सारंग जोशी, राजू चव्हाण व सचिन देवरुखकर, जनरल मॅनेजर किरण पाटील, दीपक पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!