स्वेच्छा अवयवदानाची चळवळ वाढली पाहीजे- डॉ. धडके; विद्यापीठातर्फे जागतिक अवयव दिनानिमित्त कार्यक्रम

सोलापूर / प्रातिनिधी (प्रमोद गोसावी)

           भारतात दररोज सहा हजार रुग्ण अवयव न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडतात. दर सतरा मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू होतो. अपघातात मरण पावणार्‍या दहा लाख लोकांमध्ये केवळ पन्नास नागरिक अवयव दान करण्यास तयार होतात. एका मेंदू मृत व्यक्तीने अवयव दान केल्यास नऊ जणांचा प्राण वाचू शकतो. त्यामुळे देशात स्वेच्छा अवयवदानाची चळवळ वाढणे अतिशय गरजेचे असल्याचे मत वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विठ्ठल धडके यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रेरणेतून जागतिक अवयवदान दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. धडके यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कार्यक्रमाची माहिती दिली.
        यावेळी प्र कुलगुरू देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम, वित्त व लेखाधिकारी श्रेणीक शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
           डॉ. धडके म्हणाले की, देशात पहिल्यांदा 1967 ला केम हॉस्पिटलमध्ये मुंबईत किडनीचे प्रत्यारोपण झाले. त्यानंतर हळूहळू अवयव दानाला सुरुवात झाली. मात्र आज ज्या प्रमाणात अवयवदानाची चळवळ वाढणे अपेक्षित होते, त्यातुलनेने खूपच कमी प्रमाणात अवयवदान आपल्या देशात होत आहे. 1994 मध्ये अवयव दानाविषयी कायदा करून त्यासंदर्भात नियम तयार करण्यात आले आहेत. वास्तविक इतर देशांच्या तुलनेने भारतामध्ये अवयवदानाची चळवळ वाढणे आवश्यक आहे. यासंदर्भात सामाजिक प्रबोधन होऊन जनजागृतीची अतिशय आवश्यकता आहे. पंधरा लाख किडनीची गरज असताना केवळ पाच हजार रुग्णांना किडनी मिळतात. त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. यावर मात करण्याकरिता ब्रेन डेड व अपघातात मरण पावणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांनी जास्तीत जास्त प्रमाणात अवयवदान करून इतरांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन डॉ. धडके यांनी केले.
        कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, अवयव दानासंदर्भात जनजागृती वाढविणे खूपच गरजेचे आहे. संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, एनएनएस अधिकारी यांनी स्वयंसेवक यांच्या मदतीने अवयव दानाचे महत्त्व पटवून देत अधिक जनजागृती करणे आवश्यक आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाही यासाठी पुढाकार घेऊन अवयव दान चळवळीत योगदान देत आहे. वास्तविक अवयव दानाची खूपच गरज आहे. सोशल वर्कर यांचीही भूमिका यात महत्त्वाची आहे. त्यांनीही यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!