भुदरगड तालुक्यात जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद ; सर्व व्यवहार बंद .. बंदच .. रस्ते , दुकाने सुनसान

गारगोटी /ता.९ (आनंद चव्हाण)
   कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भुदरगड तालुक्यातील सर्वपक्षीय पुकारलेल्या जनता कर्फ्यूला आज पहिल्या दिवशी तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सर्व दुकाने, बँका बंद राहिल्या. त्यामुळे बंद दुकाने आणि सुनसान रस्ते असे काहीसे चित्र आज भुदरगड तालुक्यात पहावयास मिळाले.
     भुदरगड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ७०० पर्यंत गेली असून कोरोनामुळे तालुक्यात मृत्यूची संख्या १७ झाली आहे. शिवाय दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होतांना दिसत आहे . त्यामुळे तालुक्यात भितीचे वातावरण आह
त्यातच गारगोटीच्या बाजारपेठेत लोकांची खरेदीसाठी गर्दी होत होती काही व्यापारीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे समूह संसर्गाचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे, त्यामुळे तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन आज बुधवार दि ९ ते १८ सप्टेंबर अखेर दहा दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. आज जनता कर्फ्यूचा पहिला दिवस होता, आज अपेक्षेप्रमाणे गारगोटीसह भुदरगड तालुक्यातील सर्वच गावांतील दुकाने बंद होती,
गारगोटी बाजारपेठेतील किराणा दुकाने, कापड दुकाने ,हॉटेल्स ,हातगाडी बंदच राहिली . विशेष म्हणजे तालुक्यातील बँका,पतसंस्था, सहकारी कार्यालये बंदच राहिली . शिवाय तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँका सुद्धा आज उघडल्या नाहीत . या बँकांनी बँका दहा दिवस बंद राहणार असलेचा बाहेर फलकच लावला होता. तसेच शासकीय कार्यालये आज बंदच राहिली.

       गारगोटीतील बंद असलेली बाजारपेठ

निर्मनुष्य अन् सुनसान रस्ते …

आज जनता कर्फ्यू असलेने व्यापाऱ्यांनी दुकाने उघडलीच नाहीत, त्यामुळे गारगोटीसह, कडगाव, पाटगाव, कूर, तसेच पिंपळगाव परिसरातील दुकाने बंदच राहिली, त्यामुळे रस्त्यावर नेहमीची वर्दळ नव्हती, रस्तेच ओस पडल्यासारखे चित्र होते, नेहमी गजबजलेले रस्ते आज सुनसान भासत होते. गारगोटी -कोल्हापूर, गारगोटी-गडहिंग्लज, गारगोटी-पाटगाव या राज्यमार्गावरही नेहमीची वर्दळ दिसली नाही.

error: Content is protected !!