गारगोटी / ता :५ (आनंद चव्हाण)
भुदरगड तालुक्यात गेल्या चार दिवसांत मुसळधार पाऊस सुरू असूंन वेदगंगा नदीला पूर आला आहे . वेदगंगा नदीवरील अनेक धरणे पाण्याखाली गेली आहेत. अर्थात गतवर्षी२०१९ पेक्षा यंदा पाऊस कमी आहे. धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे भुदरगड तालुक्यातील वेदगंगा नदीवरील पाटगाव धरण आज सकाळपर्यंत ८० टक्के भरले आहे . गतवर्षी या तारखेस धरण ९३ टक्के भरले होते. तर चिकोत्रा धरण ५५ टक्के भरले आहे. तर गतवर्षी चिकोत्रा धरण आज तारखेस ८४.१९ टक्के भरले होते.
हमखास पावसाची नक्षत्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुनर्वसू (तरणा) आणि पुष्य(म्हातारा) नक्षत्रात पाऊस दरवर्षीच्या तुलनेत यंदा खूपच कमी झाला.ऊन पावसाचा खेळ सुरू होता . पण गेल्या रविवारी आश्लेषा नक्षत्राने चांगली साथ दिली . गेल्या चार दिवसांत दिवसभर पाऊस कोसळत असून ओढे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. सूर्यदर्शन झालेले नाही . संततधार पाऊस कोसळत असून वेदगंगा नदीला पूर आला आहे.
भुदरगड तालुक्याची वरदायिनी असलेल्या वेदगंगा नदीवर पाटगाव (ता भुदरगड ) येथे पाटगाव धरण (सध्याचे नाव श्री मौनीसागर जलाशय ) असून या धरणात २४१०.२४ दशलक्ष घनफुट इतका पाणीसाठा होतो. भुदरगड तालुक्यासह कागल तसेच कर्नाटक राज्यातील कांही गावाची शेती या धरणामुळे ओलिताखाली आली आहे .या धरणामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
धरणक्षेत्र हे सह्याद्रीच्या घाटमाथ्याला लागून असलेने हा भाग प्रचंड अतिवृष्टीचा आहे. महाराष्ट्रातील अतिपाऊस पडणाऱ्या महाबळेश्वरपेक्षा जास्त अतिवृष्टी या धरणक्षेत्रात होते.हे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.
जून २०२० पासून या क्षेत्रात ३७१९ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून गेल्या चोवीस तासांत १०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत ४०५७ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणक्षेत्रात कमी पाऊस झाला आहे.दरवर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरते.

वेदगंगा नदीवरील अनेक धरणे पाण्याखाली भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असलेने वेदगंगा नदीला पूर आला आहे, त्यामुळे वेदगंगा नदीवरील शेळोली, शेणगाव, आकुर्डे, म्हसवे, निळपण, वाघापूर हे धरणे पाण्याखाली गेली आहेत.
चिकोत्रा धरण ५५. ५० टक्के भरले
चिकोत्रा नदीवर भुदरगड तालुक्यातील बेगवडे व आजरा तालुक्यातील झुलपेवाडी गावात हे धरण बांधले असून या धरणाचा लाभ भुदरगड तालुक्यातील पाच ते सहा गावांनाच होतो . सर्वाधिक लाभ कागल तालुक्याला होतो . सध्या या धरणात ८४५.१०९ दशलक्ष घनफुट इतका पाणीसाठा आहे,म्हणजे हे धरण ५५.५० टक्के इतके भरले आहे, या धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे प्रकल्प पूर्ण झालेनंतर काही वर्षीच हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, गेल्या वर्षी हे धरण भरले होते.गेल्या वर्षी या तारखेस ८४.१९ टक्के इतका पाणीसाठा धरणात होता . गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी आहे, गतवर्षी धरणक्षेत्रात १ जुननंतर आजअखेर २२०० मिलिमीटर पाऊस झाला होता,यावर्षी ९९४ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे.तुलनेने यंदा या भागात पाऊस कमी आहे.