बेळगाव/प्रतिनिधी
गेले काही दिवस महाराष्ट्रात चर्चा होती ती राज्याच्या सीमेवरील एका पोटनिवडणुकीची. ती निवडणूक म्हणजे बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. या निवडणुकीत भाजपनं सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात होते काँग्रेसचे सतीश जारकीहोळी. या दोघांमध्ये काट्याची टक्कर होती पण त्यांना घाम फोडला तो महाराष्ट्र एकीकरण समितीचे तगडे उमेदवार शुभम शेळके यांनी.

राष्ट्रीय पक्ष वारंवार महाराष्ट्र एकिकरण समितीचं अस्तित्व संपल्याचा दावा करतात. समितीत असलेल्या गटबाजीवर टीका होते. पण महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषकांनी या निवडणुकीत त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम यांनी तब्बल सव्वा लाख मतं घेतली. त्यामुळं बेळगावसह सीमा भागात अजूनही महाराष्ट्र एकीकरण समितीचं मोठं अस्तित्व असल्याचं स्पष्ट झालं. याठिकाणी वीस वर्षांपासून भाजपचाच खासदार निवडून येतो. पण यावेळी प्रथमच महाराष्ट्र एकीकरण समितीनं भाजपसह काँग्रेसला तगडं आव्हान दिलं. त्यामुळं मंगला अंगडी यांचा अवघ्या 2900 मतांनी विजय झाला. तर सतीश जारकीहोळी यांनाही निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला.