मुंबई/ प्रतिनिधी

जगभरात लाखो चाहते असलेले बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या याच कौशल्याचं कौतुक आता ‘इंटरनेशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्स’ (International Federation of Film Archives) करणार आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांना FIAF द्वारे सन्मानित केलं जाणार आहे. FIAF हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार पटकावणारे ते भारतातील पहिले अभिनेता ठरले आहेत. हॉलिवूड दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेस आणि क्रिस्टोफर नोलन (Martin Scorsese and Christopher Nolan) येत्या 19 मार्चला हा पुरस्कार त्यांना प्रदान करणार आहेत.
FIAF पुरस्काराचा यंदाचा २०वा वार्षिक समारोह आहे. FIAFचे अध्यक्ष फेडरिक मेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा ते वेगळ्याच पद्धतीने हा पुरस्कार सोहळा साजरा करणार आहेत. यंदा या सोहळ्यामध्ये वर्षभरात गाजलेल्या शॉर्ट फिल्म आणि कलाकारांच्या मुलाखती देखील दाखवल्या जाणार आहेत. दरवर्षी हा पुरस्कार सोहळा अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे साजरा केला जातो. मात्र यंदा करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे तो ऑनलाईन पार पाडला जाणार आहे.