मागील वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये व यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्यावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये आज (दि. १९ रविवारी) सकाळी 9 वाजले पासून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (raju sheeti) यांनी जयसिंगपूर येथे दिली.
राजू शेट्टी पुढे म्हणाले की, १३ सप्टेंबर पासून ऊस दरासाठी आमचे आंदोलन सुरू आहे. दि. १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे २२ वी ऊस परिषद झाली. तसेच ७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडागंणावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ऊस दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. तरीही ऊस दराचा प्रश्न निकाली निघालेला नाही.

आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत, त्यामुळे हे चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. मी स्वतः हातकणंगले येथे रस्त्यावर उतरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उदगाव टोल नाका, चौंडेश्वरी फाटा, नृसिंहवाडी, कबनूर, नदीवेस इचलकरंजी, हेरवाड, हुपरी, वडगाव, कागल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, कोडोली, परिते, आदी ठिकाणी रास्ता रोखो होणार आहे. सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे, बीड, लातूर, नंदूरबार, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यासह संपूर्ण ऊस पट्ट्यात चक्का जाम आंदोलन होणार आहे.