खोचीत चंपाषष्ठी साजरी

खोची परिसरात चंपाषष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाने १३ डिसेंबरपासून सुरू असलेल्या खंडोबा षडरात्रोत्सव उपवासाची सांगता झाली. कुलस्वामी खंडोबा असणाऱ्या भक्तगणांनी कुलाचार पार पाडला. यावेळी लहान थोर सर्वांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. खंडोबा षडरात्र उत्सव उपवास सोडल्यानंतर सायंकाळी प्रत्येक कुटुंबाच्या अंगणात चंपाषष्ठी साजरी करण्यात आली.
खोची येथील शिंदे- पाटील, गायकवाड, दाडमोडे, केडगे, घोडके, पवार, मुसळे, जगदाळे तसेच रामोशी समाजातील भक्तगणांनी षष्ठी उत्सव साजरा केला.यावेळी भक्तगणांनी दिवट्या मशालीच्या उजेडात कुलाचार पार पडला. तळीभंडारा धार्मिक विधी झाला. यावेळी सदानंदाचा येळकोट येळकोट असा गजर करत भंडाऱ्याची उधळण केली. खंडोबाला आवडता नैवेद्य बाजरीची भाकरी, कांदा, गाजर, वांग्याचे भरीत, राळ्याच्या तांदळाचा भातशेती अर्पण केला. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. उपवासकर्त्यांनी जेजुरी, पाली तसेच मंगसुळी या ठिकाणी जाऊन श्रींचे दर्शन घेतले.

error: Content is protected !!