इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये चिमुकल्या वैदिशाच्या नावाची नोंद

चंद्रपूर/प्रतिनिधी

     २०० देशाची राजधानी, राष्ट्रध्वज मुखपाठ असल्याने चंद्रपूर येथील वैदिशा शेरेकर या अडीच वर्षांच्या चिमुकलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनंतर आता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. एवढ्या लहान वयात मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे तिचे सर्वंत्र कौतुक होत आहे.

   चंद्रपूर येथील बँक ऑफ इंडिया पद्यापूर शाखेमध्ये सहायक रोखपाल पदावर कार्यरत असलेले वैभव शेरेकर हे मुळचे अकोला येथील आहे. नोकरीनिमित्त ते चंद्रपूर येथे स्थिरावले. त्यांना वैदिशा ही एकुलती एक मुलगी आहे. अवघ्या एक वर्षांची असताना तिला एक गोष्ट सांगितली की तिच्या लक्षात रहायची. तिच्या असाधारण कुशाग्र बुद्धीचा कसा सदुपयोग करता येईल यावर विचार करून, शेरेकर कुटुंबीय तिला नवनवीन पाठ्यपुस्तके आणत होते.

   वैदिशा जवळपास अडीच वर्षांची झाल्यानंतर तिच्यासाठी सर्व देशांच्या राजधानी व राष्ट्रध्वजाची माहिती असलेले चार्ट आणून त्या माध्यमातून तिला तिची आई दिपाली शेरेकर यांनी माहिती देण्यास सुरूवात केली. तिने अवघ्या पंधरा वीस दिवसांत २०० पेक्षा अधिक देशांची राजधानी तसेच त्यांचे राष्ट्रीय ध्वज अचूकपणे सांगण्याइतपत तयारी केली. वैदिशाला २०० देशाहून अधिक देशाची राजधानी मुखपाठ असून या सर्व देशांचे राष्ट्रीय ध्वज ती अचूक ओळखते. तिच्या या कामगिरीची दखल जानेवारी महिन्यातच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली होती. शिवाय तिचे नावाची नोंद देखील इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली गेली आहे.

   दरम्यान मुलीची तल्लख बुध्दीमत्ता असल्याने वडील वैभव शेरेकर यांनी इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या मुलीच्या नावाची नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी अर्ज केला. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने वैदिशाला २०० देशाची राजधानी, राष्ट्रध्वज मुखपाठ असल्याने लहान वयात केलेल्या असाधारण कामगिरीस पाहून तिचे नाव इंटरनॅशनल बुक रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवून घेत तिचा जागतीक स्तरावर गौरव केला आहे. सध्या वैदिशा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी तयारी करीत आहे. त्याअनुषंगाने ती कसून सराव करत आहे. खेळण्या बागळण्याच्या वयात इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंद झाल्याने सर्व स्तरातून वैदिशावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.

error: Content is protected !!