चोकाक येथील सरपंच पतीवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला ; अतिक्रमण काढण्याच्या रागातुन प्रकार

हातकणंगले /ता.५-प्रतिनिधी
    सरकारी जागेत केलेले अतिक्रमण काढण्यासाठी पाठपुरावा केलेच्या व पोष्ट खात्यामध्ये तक्रार अर्ज दिल्याच्या रागातुन चोकाक (ता. हातकणंगले ) येथील महिला सरपंच पतीवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करून जबर जखमी केल्याची घटना घडली आहे. प्रशांत बापुसो पाटील (वय -32 ) व प्रतीक प्रवीण कत्ते ( वय -२० ) अशी हल्लेखोरांची नावे असून ते नात्याने मामा-भाचे आहेत. याबाबतची फिर्याद सरपंच मनीषा सचिन पाटील यांनी हातकणंगले पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक भवड करीत आहेत.
    हातकणंगले पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की , चोकाक (ता. हातकणंगले ) येथील बापुसो पाटील यांनी 2005 साली सरकारी जागेत अतिक्रमण करून राहण्यासाठी घर , जनावरांचा गोठा व चार दुकान गाळे बांधले आहेत. त्यातील दोन गाळे कापड दुकान व खाजगी ऑफिससाठी भाड्याने देऊन एका गाळ्यात स्वतःचे किराणा दुकान तर एक गाळा पोष्टासाठी भाड्याने दिला होता .
     सरपंच मनीषा पाटील यांनी 17 फेब्रुवारी 2020 पासून गावातील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्याकडून अतिक्रमण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे हातकणंगले तहसिलदार कार्यालयाकडे अतिक्रमण प्रकरण चौकशीसाठी आले असुन कारवाई अंतिम टप्प्यात आली आहे.
तसेच अतिक्रमीत बापुसो पाटील यांच्या पत्नीने चोकाकमधील पोष्टात गैरव्यवहार केला आहे . त्याच्या चौकशीसाठीचा तक्रार अर्ज सरपंच पती सचिन पाटील यांनी कोल्हापूरच्या मुख्य पोष्ट कार्यालयात दिला होता. त्यावरून चौकशी होवुन बापूसो पाटील यांच्या पत्नीला पोष्टातून निलंबित केले आहे. हा राग मनात धरून बापुसो पाटील यांचा मुलगा प्रशांत पाटील व नातू प्रतीक कत्ते यांनी सरपंच मनीषा पाटील व त्यांचे पती सचिन पाटील यांच्यावर काल रात्री पावणे नऊच्या दरम्यान लोखंडी रॉडने जबर हल्ला करून मारहाण केली. यामध्ये सचिन पाटील यांच्या डोक्यात वर्मी घाव बसला आहे. तर सरपंच पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे.

error: Content is protected !!