CM ठाकरेंचा PM मोदींना तातडीचा फोन, ऑक्सीजन तुटवड्यामुळे राज्यात भीषण स्थिती

 राज्यात करोना संसर्गाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यातच ऑक्सीजनचा तुटवडा भासू लागल्याने भीषण स्थिती निर्माण झाली असून काही रुग्णांना प्राणासही मुकावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला असून महाराष्ट्राला तातडीने १२०० ते १५०० मेट्रिक टन ऑक्सीजनची आवश्यकता आहे, अशी विनंती त्यांच्याकडे केली आहे. गेल्या २४ तासांत मुख्यमंत्री तीनवेळा पंतप्रधानांशी बोलल्याचेही सांगण्यात येत आहे.

संग्रही छायाचित्र

राज्यात ऑक्सीजन तुटवडा भासत असल्याने स्थिती आणखीच गंभीर बनली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक सविस्तर पत्र दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. राज्यातील कोविडची सध्याची स्थिती व आकडेवारी त्यात नमूद करतानाच अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत वैद्यकीय कारणासाठीच्या ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला असल्याकडे लक्ष वेधले होते. राज्यात कोविड चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यात नवीन रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. ३० एप्रिलपर्यंत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ११.९ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या स्थितीत ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला असून राज्यात आज दरदिवशी १२०० मेट्रिक टनपेक्षा जास्त ऑक्सीजनची गरज आहे. एप्रिल अखेरपर्यंत ऑक्सीजनची ही मागणी दिवसाला २ हजार मेट्रिक टन इतकी होऊ शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागातून स्टील प्रकल्पांतून ऑक्सीजन घेण्यास केंद्र शासनाने आम्हाला मान्यता दिली आहे. मात्र, वेळेत ऑक्सीजन मिळणे गरजेचे असल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ऑक्सीजनची वाहतूक इतर मार्गांनी आणि त्यातही प्रामुख्याने हवाई मार्गे होण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. या पत्रानंतर ऑक्सीजनची तातडी लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आता पंतप्रधानांना थेट फोन केला आहे. गेल्या २४ तासांत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना तीनवेळा फोन केला असून ऑक्सीजनच्या तुटवड्याअभावी निर्माण झालेली स्थिती त्यांच्या कानावर घातली आहे, असे सांगण्यात येत आहे.

error: Content is protected !!